Kolhapur News: मंत्रिमंडळात झालेल्या विस्तारानंतर खाते वाटप झाले. या खाते वाटपात कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय विभागाची जबाबदारी पदरी पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून हसन मुश्रीफ हे राज्याचं नेतृत्व करणार आहेत. तर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून आमदार प्रकाश आबिटकर हे राज्याचे नेतृत्व करणार आहेत.
जिल्ह्याच्या वाट्याला दोन्हीही महत्त्वाची पदे ही आरोग्य विभागाची असल्याने महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी कोल्हापुरवर आली आहे. राज्यात आरोग्य क्रांती घडवण्यास हे दोघेही नेते सज्ज असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
खातेवाटप झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदावर पुन्हा हसन मुश्रीफ यांना संधी देण्यात आली. महायुती सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री पदावर आपली मोहर उठवली होती.
11 महिन्याच्या कालावधीत त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. इतकेच नव्हे तर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात देखील अनेक बैठका घेत वैद्यकीय शिक्षण विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या विभागाच्या मंत्रिपदाची धुरा मुश्रीफ यांना देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची जबाबदारी दिली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात पहिल्यांदाच शिवसेनेला मंत्रिपद मिळाल्याने आबिटकर यांना आरोग्य खात्याची जबाबदारी दिली आहे.
त्यांनी देखील आपण वैद्यकीय क्रांतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या इतिहासात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांना राज्याच्या आरोग्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. या अगोदर त्यांनी आरोग्य राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
का हवे होते मुश्रीफांना वैद्यकीय शिक्षण?पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना कोल्हापुरातील छत्रपती प्रमालीराजे रुग्णालयातील नवीन आणि अद्यावत सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहिले होते. शिवाय शेंडा पार्क येथे नवीन अद्यावत 100 बेडचे माताबाल रुग्णालय, 180 बेडचे मुलींचे वस्तीग्रह, अडीचशे बेडचे कॅन्सर रुग्णालय, आणि सहाशे बेडचे सर्वसाधारण रुग्णालयासाठी मंजुरी आणली होती. त्यामुळे ह्या रुग्णालयाला उभारी देण्यासाठी पुन्हा या खात्याची मंत्रिपदाची धुरा आपल्याला मिळावी. यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील होते.