उल्हासनगर - विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी बांगलादेशी तरुणी उल्हासनगर क्राईम ब्रॅंचच्या (गुन्हे अन्वेषण) जाळ्यात अडकली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी गेल्या काही दिवसात बांगलादेशिंवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.
क्राईम ब्रॅंचच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे पाडा मधील आई निवास मध्ये बांगलादेशी तरुणी राहत असल्याची माहिती मिळाली होती.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे, योगेश महाजन, अर्जुन मुत्तलगिरी, महिला पोलीस नाईक मनोरमा सावळे यांनी आई निवास मधील घर क्रमांक 7 मध्ये धडक देऊन 28 वर्षीय यास्मिन अख्तर गयाशुद्दिन या तरुणीला ताब्यात घेतले.
तिच्याकडे विचारपूस आणि चौकशी केल्यावर ती बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून, उपजीविकेसाठी हॉटेलमध्ये महिला वेटरचे काम करत असल्याची कबुली यास्मिनने दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी यापूर्वी कोळशेवाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा चार कारवाया बांगलादेशीवर केल्या आहेत.