Maharashtra Politics : खूप झालं सहन करायचं तरी किती? महायुतीत धुसफूस; मंत्री संजय शिरसाट यांच्या नावाला भाजपचा विरोध
esakal December 24, 2024 08:45 PM

छत्रपती संभाजीनगर : आमची ताकद अधिक असताना लोकसभेत शिंदे गटाला जागा दिली. काम करून खासदार निवडून आणला. विधानसभेतही अधिक जागा त्यांनाच. त्यावेळीही त्यांचे काम केले. आता पुन्हा पालकमंत्री त्यांचाच का? आता बस्स... आणखी किती सहन करायचे? अशा शब्दात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री शिरसाट यांच्या नावाला तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे युतीत धुसफूस वाढली आहे.

महायुती सरकारने नुकतेच आपले मंत्री जाहीर केले. त्यांचे खाते वाटपही झाले. यात शहरातून भाजपचे आमदार अतुल सावे, तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण, यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

आधी मंत्री शिरसाट यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असल्याचा दावा केला. यानंतर मंत्री सावे यांनीही आम्ही पालकमंत्रिपदासाठी मागणी केली असल्याचे सांगितले. यावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात युतीतच धूसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची जागा शिंदे गटाला सोडून त्यांचे काम करून खासदार निवडून आणला.

विधानसभेतही त्यांच्या वाट्याला अधिक जागा देत त्यांचे आमदार निवडून आणण्यात भाजपने महत्त्वाची भूमिका बजावली. असे असताना आता पुन्हा पालकमंत्रिपदही शिंदे गटाला का द्यावे, अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. परंतु, याबाबत उघडपणे बोलण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला.

सावेच पालकमंत्री व्हावेत, भाजपचा ठराव

भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात सोमवारी सदस्य नोंदणी प्रशिक्षण वर्ग पार पडला. समोर येऊन बोलण्यास नकार देणारे पदाधिकारी येथे मात्र चांगलेच बोलते झाले. येथे बोलताना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रिपदासाठी मंत्री शिरसाट यांच्या नावाला विरोध दर्शविला. दुसरीकडे मंत्री सावे हेच पालकमंत्री व्हावेत, अशी जाहीर भूमिका मांडली. एवढ्यावर न थांबता, एकमताने सावे पालकमंत्री व्हावेत, असा ठराव घेतला. हा ठराव घेऊन पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत.

पालकमंत्रिपदात इंटरेस्ट का ?

तीन महिन्यांनी महापालिका निवडणूक होणार आहे. त्यात भारतीय जनता पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार करीत आहे. यासाठी पालकमंत्रिपद हाती असेल तर या निवडणुकीत त्याचा लाभ होईल. दुसरीकडे स्थानिक राजकारणावर भाजपची पकड राहील. या उलट शिंदे गटाकडे हे पद गेल्यास शिंदे गटाला शहरात आणखी बळ मिळेल. महापालिकेच्या तोंडावर ते भाजपला परवडणारे नाही. एकतर खासदार शिंदे गटाचा, आमदार शिंदे गटाचे अधिक त्यात पालकमंत्रिपदही त्यांनाच गेले तर मग हे भाजपसाठी पोषक ठरणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांतून बोलले जात आहे.

आमचा कुणाच्याही नावाला विरोध नाही. मंत्री सावे यांना यापूर्वीचा पालकमंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यात शहरातील पाणीपुरवठा योजना, आलेले उद्योग, कंपन्या, या सर्वांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे हे प्रोजेक्ट पुढे नेण्याच्या दृष्टीने मंत्री सावे पालकमंत्री झाल्यास त्याचा शहराला लाभ होईल. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची तशी इच्छा आहे.

— शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप

माझ्या नावाला विरोध असे काही नाही. प्रत्येकाला वाटते आमचा पालकमंत्री व्हावा. सावेंच्या नावाचा ठराव झाला असेल, पण ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आम्ही विरोध करण्याचे कारण नाही. पालकमंत्री कुणाला करायचे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.

— संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.