Maharashtra Live Update: जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी
Saam TV December 25, 2024 09:45 AM
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी

मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डंपरची चाके फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पवई आयआयटी ते एमआयडीसी दरम्यान ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे पवई कडून जोगेश्वरी च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे मागील तीन तासांपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत वाहतूक पोलिसांकडून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे मात्र क्रेनची उपलब्धता होत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी अशीच राहणार आहे.

भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत धुळ्यात भाजपची पार पडली बैठक

राज्यात विधानसभा निवडणूक आटोपली असून सर्व प्रक्रिया पार पडल्या त्यानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे, त्यानुसार महाराष्ट्रात दीड कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आज धुळ्यात दिली, तर धुळे जिल्हा हा आता भाजपाचा बालेकिल्ला झाला असल्याच म्हणत धुळे शहरासह धुळे ग्रामीणमधून आपण साडेतीन लाख सदस्य नोंदणी करणार असल्याची ग्वाही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे.

पंढरपुरात अवैध दारूचा मोठा साठा जप्त

पंढरपूर जवळच्या रांझणी गावातील एका घरामध्ये अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 3 लाख 27 हजार रूपये किंमतीचे 96 दारूचे बाॅक्स जप्त केले आहेत ही कारवाई उपविभागीय अधिकारी अर्जून भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीसांनी केली आहे. अवैध दारू साठा प्रकरणी प्रदीप आवताडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 22 कोटींचा घोटाळा

13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

विधान परिषदेचे सभापतीपद मिळताच राम शिंदे लक्ष्मी माता अंबाबाईच्या दर्शनाला

विधानसभेला निवडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं मात्र आता सभापती झाल्यानंतर दर्शन घेतलं. विधानसभेत पराभव झाल्यानंतर देखील माझी वरिष्ठ पदावर निवड झाली. निवडून आलो असतो तरी पद मिळाला असतं आणि निवडून आलो नाही तरी पद मिळालं, असं राम शिंदे म्हणाले.

आमदार तोडसामच्या शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी

भाजपचे आमदार राजु तोडसाम यांनी सध्या त्यांच्या मतदारसंघातील तीनही तालुक्यात समाधान शिबीर घेऊन नागरिकांच्या प्रलंबित अडचणी समजून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न करताहेत.आर्णी येथील तहसील कार्यालयात आयोजित समाधान शिबीरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अमरावती मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात बसपाचे धरणे आंदोलन..

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसदेत केलेल्या वक्त्यव्याचा निषेध करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य बाबासाहेबांचा अपमान करणारे असून त्यांनी देशाची माफी मागावी आणी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना सांताक्लॉज कडून चॉकलेट भेट, वाहतूक पोलीसांचा उपक्रम.

नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना सांताक्लॉजद्वारे चॉकलेट देण्यात आले. नवी मुंबई वाहतूक पोलीसांतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमा दरम्यान वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना नाताळच्या पाश्वभूमीवर थेट सांताक्लॉज चॉकलेट देण्यासाठी अवतरला होता. यावेळी वाहन चालकांनी या उपाक्रमाचे स्वागत केले तर वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्व वाहनचालकांना केलेय.

धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ लक्झरी बसचा भीषण अपघात झालं आहे.या अपघातात एक महिला ठार तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अंबाबाईच्या दर्शनाला

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अंबाबाईच्या दर्शनाला

सुट्ट्यांमुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनाला व्हीआयपी गेटमधून आल्यानं भाविकांनी केली आरडाओरड

सभापती राम शिंदे यांच्या समोरच नागरिकांनी केली आरडाओरड

बराच वेळ देवीच्या दर्शनासाठी रांगेत ताटकळत थांबलेल्या भाविकांनी केला संताप

राम शिंदे यांनी आपलं दर्शन आटोप्त घेत मंदिरातून पडले बाहेर

यशोमती ठाकूरमी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागते, आम्ही काय कारणामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही ते माहीत नाही. पण मी विनंती केली होती, शेतकऱ्यांनी सोयाबीन विकू नका, आम्ही सात हजार रुपये भाव देऊ पण आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही, जे सत्तेत आले ते जुमल्याण्यासाठी फेमस आहे. Beed News : बीड शहर घाणीच्या विळख्यात; नागरिकांसह मोकाट गाईंचे आरोग्य धोक्यात

बीड जिल्ह्याचे ठिकाण असणारे बीड शहर हे घाणीच्या विळख्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. शहरातील विविध चौकात आणि रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांसह मोकाट गाईंचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील बाळासाहेब शिंदे नगर, राजीव गांधी चौक, सुभाष रोड, नगर रोड, माळवेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, बार्शी रोड यासह विविध परिसरांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. दरम्यान यामुळे बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात असून तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे...

Maharashtra Live Update: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव निम्म्यापेक्षा अधिक घसरले

- नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव निम्म्यापेक्षा अधिक घसरले

- ९ डिसेंबरला बाजारात असणारा कांद्याचा ३,४०० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव आज २४ डिसेंबरला १६०० ते १७०० रुपयांपर्यंत घसरला

- अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटलय, त्यात भाव देखील पडल्यानं शेतकरी हवालदिल

- सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीचं असल्यानं कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

- कांद्याचे भाव पडल्याने दररोज कोट्यावधींचे नुकसान सहन करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

- सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने हटवावं आणि कांद्याला कायमस्वरूपी चांगला भाव मिळेल, यासाठी उपाययोजना कराव्यात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

- दरम्यान सायखेडा बाजार समितीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

Maharashtra Live Update: भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन धाराशिवपर्यंत

हत्या प्रकरणात धाराशिवमधील कळंब येथून एका आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा व धाराशिव पोलिसांची कारवाई

आतिष जाधव असं आरोपीचे नाव धाराशिवमधील उंबरे कोटा येथील रहिवाशी

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा ९ डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता

भाडेकरुनी पाच लाखांची सुपारी घेऊन खून केल्याचं तपासात समोर आलेलं आहे.

माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास पोलीस जबाबदार : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत

तुमचा ही संतोष देशमुख केला जाईल,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना पञाद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यानविधानसभा निवडणुकीच्या आधीही माझ्या घरासमोर गोळीबार झाला होता त्याचाही अद्याप शोध लागला नाही.माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी पोलिसात जबाबदार असतील अस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी म्हटलय.दरम्यान या झालेल्या घटने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटना मुद्दामून करत आहे का? याचा शोध घेतला पाहिजे असं सावंत म्हणाले.

पुण्यात काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या विरोधात आंदोलन

- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन

- केंद्रीय मंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याचा काँग्रेसचा आरोप

- याआधी सुद्धा काँग्रेस ने केले होते अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अतिक्रमण; भाविकांना होतोय त्रास

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात स्थानिक फेरीवाले आणि हातगाडी वाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरच दुकाने मांडल्याने भाविकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मंदिर सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा आहे. तरी देखील मंदिर परिसरात होणार्या अतिक्रमणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

Solapur News: नाताळ आणि थर्टीफस्टच्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी...

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रासह आंध्र,कर्नाटक,तेलंगणा, गोवा आणि गुजरात मधून भाविक आले असून,पहाटे पासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याच चित्र दिसून येत आहे

Weather Update: २७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

परभणी येथील प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री यांच्या बद्दल वक्तव्याचा बुलढाणा येथे जाहीर निषेध...

परभणी येथे भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्या प्रकरणी त्यावरून आंबेडकरी समाजाला कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अमानुष्य मारहाण केल्याप्रकरणी व या मारहाणीत तरुण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला प्रकरणी झालेल्या अन्यायाची तत्काळ चौकशी करून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळण्यात यावा तसेच केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे संपूर्ण भारत वासियांची माफी मागावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने केले त्यानंतर निवेदन देण्यात आले...

नाताळ सणाचा उत्साह; राहाता शहरात सांता क्लॉजची शोभा मिरवणूक

नाताळ सणाचा उत्साह ठिकठिकाणी दिसुन येतोय.. ख्रिस्ती बांधव नाताळ हा आनंदाचा सण म्हणून साजरा करतात.. चर्च तसेच घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आलीये.. सणाच्या पार्श्वभुमीवर राहाता शहरातुुन चित्ररथाची शोभा मिरवणुक काढण्यात आली.. फटाक्यांची आतिशबाजी तसेच चित्ररथावर सांता क्लॉजसह विवीध वेशभुषा साकारेलेले विद्यार्थी दिसुन आले.. ख्रिस्ती बांधवांनी हातात कॅंडल घेत या मिरवणुकीत सहभाग घेतला..

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट..

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावर ....

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.....

पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता.....

Pune News: ३८ हजार पुणेकरांच्या तक्रारी, एका वर्षात तब्बल ६६९ कोटींचा सायबरफ्रॉड

शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे ६६९ कोटी रुपये पळवले आहेत. याप्रकरणी तब्बल ३८ हजार पुणेकरांनी तक्रारी दिल्या आहेत. कधी दुप्पट पैसे देण्याचे आमिष तर कधी पोलीस कारवाईची भीती, तर कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठवल्याचे सांगत ही फसवणूक केली जातेय. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या अमिषाने फसवणूक केली जातेय. आपल्या बँकेच्या कुठली ही माहिती कोणाला ही देऊ नका तसेच कुठला ही फसवणूक तुमच्या बद्दल घडली असेल तर सायबर विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.

Maharashtra Live Update: आज काळम्मावाडी धरणाच्या गळतीची पाहणी समिती करणार

दूधगंगा दगडी धरणाची गळती काढण्याच्या कामास नववर्षाचा मुहूर्त साधला गेलाय. सिंचनाकरिता आवश्यक पाण्यासाठी नियोजन करून समितीच्या सल्ल्यानुसार गळती प्रतिबंध उपाययोजना प्रत्यक्ष कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान गळती प्रतिबंधक कामाचे नियोजन करण्यासाठी 13 डिसेंबर 2024 रोजी नेमलेली तज्ञांची समिती आज काळम्मावाडी धरणाला भेट देऊन पाहणी करणार आहे. काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या ठिकाणी स्वतः पाहणी करून काळम्मावाडी धरणाची गळती दाखवून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला होता. जलसंपदा विभागाकडून आज काळम्मावाडी धरणाच्या गळतीची पाहणी केली जाणार आहे.

Maharashtra Live Update: सिंधुदुर्गात लाल तोंडी माकडांचा हैदोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातला आहे. शेतकऱ्यांच्या केळी, चिकू, नारळ तसेच कडधान्य पिकाचे अतोनात नुकसान माकडांच्या कळपा कडून केल जात होत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला होता. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यामुळे वनविभाग आता अॅक्शन मोड वर आला आहे. वनविभागाकडून सध्या जिल्ह्यात ठीकठीकाणी माकड पकड मोहीम राबवली जात असून आता पर्यंत आठशे माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माकड पकड मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार असून ज्या गावात माकड उपद्रव करत करत आहेत त्या शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Live Update: इक्बाल कासकरच्या हस्तकाच्या घराचा ईडीने घेतला ताबा

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकाच्या घराचा घेतला ईडीने ताबा

ठाण्यातील घरावर ईडीची कारवाई

इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

एप्रिल २०२२ साली घेण्यात आलं होत घर ताब्यात

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून मालमत्ता बळकवल्याचा आहे ईडीचा आरोप

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून घारासह ९० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप

Maharashtra Live Update : चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात

जालन्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव येथे अपघात झालाय. जाफ्राबाद-चिखली रोडवरील कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात झालाय. कोळेगाव फाट्याजवळील घाट चढताना बस 20 ते 25 फूट खड्ड्यात जाऊन उलटी झाली.या अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.बस चालकाचं बस वरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

Maharashtra Live Update: वाशिममध्ये नाफेडच्या केंद्रांवर बारदाना संपला

वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदाना संपल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी थांबली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हमीभावाने खरेदी बंद आहे. बारदान्याचा पुरवठा करणाऱ्या कोलकत्यामध्येच टंचाई असल्यामुळे तो कधी मिळेल ते सांगता येत नाही. जिल्ह्यात नाफेड आणि एनसीसीएफमार्फत पाच ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रं सुरू आहेत.

Maharashtra Live Update: माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी तुम्हा सर्वांची गरज - वैभवी देशमुख

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची महविकास आघाडीतील सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगी वैभवी हे देखील हजर होते. सगळ्यांच्याच भाषणानंतर वैभवी देशमुख हिने देखील सगळ्यांशी संवाद साधला. मात्र हा संवाद साधताना ती अतिशय भावनिक झाल्याच पाहायला मिळालं. दरम्यान "तुमची मला गरज आहे, माझे काका एकटे नाही लढू शकणार, तुम्हा सगळ्यांच्या साथीची मला सध्या गरज आहे" अशी साद देखील वैभवी संतोष देशमुख हिने घातली..

Maharashtra Live Update: नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी

नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे.. साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसत असून पुढील आठ ते दहा दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे.. प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीत लाखो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावत असतात.. यावर्षी देखील भाविकांच्या गर्दीने साई नगरी फुलून गेली आहे. सलग सुट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळी नागरिक हजेरी लावत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.