क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी आणि बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत फायनलसह एकूण 15 सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघाना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे 4 आणि 5 मार्चला होणार आहेत. तर 9 मार्चला अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र टीम इंडियाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे सामने होणार आहेत. तर भारताचे सामने हे दुबईत होणार आहेत. आयसीसीने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह एकूण 3 आशियाई संघ आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा समावेश आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सलामीचा सामना हा यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात 2 मार्चला इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.
प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील पहिले 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतून 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. तर अंतिम सामन्यानंतर विश्व विजेता ठरेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता.त्यामुळे आयसीसीने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. टीम इंडियाचे साखळी फेरीतील तिन्ही सामने हे दुबईत होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना हा दुबई तर दुसरा सामना हा लाहोरमध्ये होणार आहे. तसेच टीम इंडिया फायनलला पोहचली तरच हा सामना दुबईतच होईल अन्यथा लाहोरमध्ये महाअंतिम सामन्याचा थरार रंगेल. सर्व सामने हे डे-नाईट असणार आहेत.
दरम्यान साऱ्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे लागून आहे. उभयसंघातील हा बहुप्रतिक्षित सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबईत होणार आहे.
अफगाणिस्तानची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील अव्वल 7 संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच तिकीट मिळवलं. तर पाकिस्तानला यजमान असलेल्या संधी मिळाली आहे. तर श्रीलंका आणि विंडीजला टॉप 7 मध्ये राहण्यात अपयश आल्याने ते चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळू शकणार नसल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं होतं.