“विनोद कांबळीने काही चुका केल्या अन् आता तो…” प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले
GH News December 25, 2024 05:12 PM

Vinod Kambli Health Update : माजी क्रिकेट विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. विनोद कांबळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळीच्या उपचारासाठी पाच लाखांची मदत केली आहे. या मदतीनंतर विनोद कांबळी यांनीही एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल एक मोठी माहिती दिली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच विनोद कांबळींवर पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

२० लाख जमा झाले

“विनोद कांबळीची प्रकृती आता खूप चांगली आहे. वानरसेना नावाची आमची संस्था आहे. ही संस्था ज्या कोणाला गरज असेल, त्याला महिना दोन महिन्यात मदत करत असतात. काही महिन्यांपूर्वी वानरसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. या संस्थेच्या माध्यमातून २० लाख जमा झाले आहेत”, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

उपचारासाठी तीन रुग्णालय कटिबद्ध

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं म्हणून मी भेटायला आलो होतो. विनोद कांबळी यांना आतापर्यंत ३० लाखांची मदत मिळाली आहे. त्यांच्या पत्नीकडे ही सर्व रक्कम जमा आहे. त्याच्यावर पूर्ण उपचार करण्याची जवाबदारी आम्ही घेतली आहे. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल , इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती हॉस्पिटल हे तीन हॉस्पीटल विनोद कांबळी यांच्यावर उपचार करणार आहेत. या तीन हॉस्पिटल प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध आहेत, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

…ही चूक पुन्हा होणार नाही

“मी विनोद कांबळीला आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे, असे त्याला सांगितलं आहे. त्याने ९३-९४ वर्षी लग्न केले. या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने माझ्या फार्महाउसवर केला होता. पण त्याने गरज नसताना काही चूक केल्या, त्या तो आता भोगतोय. आता त्याने सांगितला आहे की ही चूक पुन्हा होणार नाही”, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.