ICC Men's Test Bowling Rankings: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात काही दिवसांपूर्वीच ब्रिस्बेनमधील गॅबावर कसोटी मालिकेचा तिसरा सामना झाला होता. आता २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी आयसीसीने बुधवारी (२५ डिसेंबर) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहारने नवा विक्रम केला आहे.
कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल क्रमांकावर कायम आहे. पण ब्रिस्बेन कसोटीत त्याने घेतलेल्या ९ विकेट्समुळे आता त्याच्या रेटिंग पाँइंट्समध्ये १४ पाँइंट्सची वाढ झाली आहे. त्याचे ९०४ रेटिंग पाँइंट्स झाले आहेत.
त्यामुळे बुमराह कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत ९०० हून अधिक रेटिंग पाँइंट्स मिळणारा आर अश्विननंतरचा दुसराच भारतीय आहे, तसेच पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
अश्विननेही डिसेंबर २०१६ मध्ये वानखेडे कसोटीनंतर ९०४ रेटिंग पाँइंट्सपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता अश्विनच्या ९०४ रेटिंग पाँइंट्सच्या विक्रमाला मागे टाकून सर्वाधिक रेटिंग पाँइंट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज होण्याची बुमराहला संधी आहे.
सध्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (८५६ रेटिंग पाँइंट्स) आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड (८५२ रेटिंग पाँइंट्स) आहे.
पॅट कमिन्स (८२२ रेटिंग पाँइंट्स) चौथ्या आणि भारताचा आर अश्विन (७८९) पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाची मात्र क्रमवारी घसरली आहे. तो ४ क्रमांकाने घसरून १० व्या क्रमांकावर आला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत ब्रिस्बेन कसोटीत १५२ धावांची मोठी खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने (८२५ रेटिंग पाँइंट्स) मोठी प्रगती केली आहे. तो आता यशस्वी जैस्वालला (८०५ रेटिंग पाँइंट्स) मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
या क्रमवारीत जो रुट ८९५ रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर हॅरी ब्रुक (८७६ रेटिंग पाँइंट्स) आणि तिसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन (८६७ रेटिंग पाँइंट्स) आहेत.
याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही गॅबावर शतक ठोकले होते. त्यामुळे तोही आता टॉप-१० फलंदाजांमध्ये पुन्हा आला आहे. तो आता ७२१ रेटिंग पाँइंट्ससह १० व्या क्रमांकावर आला आहे. केएल राहुलचीही कामगिरी केल्या काही सामन्यांमध्ये चांगली राहिल्याने त्याने १० स्थानांची झेप घेतली असून आता तो ४० व्या क्रमांकावर आहे.
परंतु, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल अशा खेळाडूंची घसरण झाली आहे. रोहित ५ स्थानांनी घसरून ३५ व्या क्रमांकावर, शुभमन गिल ४ स्थानांनी घसरून २० व्या क्रमांकावर, पंत ९ वरून ११ व्या क्रमांकावर, तर विराट एका स्थानाने घसरून २१ व्या क्रमांकावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पॅट कमिन्सने पुन्हा एकदा टॉप-१० खेळाडूंमध्ये जागा मिळवली आहे. तो आता ८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत भारताचा रविंद्र जडेजा अव्वल क्रमांकावर कायम आहे.