“गेल्या काही काळात विशेषत: यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागात महिलांवरील अत्याचार, लूटरमार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या याच प्रमाण वाढलं आहे. गुंडांना अभय दिलं जातय. या सर्वकाळात लाडके खासदार तिथे फिरकतही नाहीत. कालची अक्षय शिंदेनंतरची घटना अत्यंत धक्कादायक अशीच आहे. हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? अक्षय शिंदेच तुम्ही निवडणुकीआधी एन्काऊंटर केलं. कारण तुम्हाला राजकीय फायदा हवा होता. आता हा जो नराधम पकडलेला आहे. ज्याने त्या मुलीची हत्या केली. लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार गप्प का आहेत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
“बीडमधलं चित्र अत्यंत गंभीर आहे. लवकरच उद्धव ठाकरे परभणी, बीडला जातील. बीडमधला प्रकार हा बिहारमधल्या अनेक जिल्हयात अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या, मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण असं बिहराच चित्र होतं. हे चित्र तुम्हाला बीड, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात दिसतय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “फडणवीसांना आज मी व्हिडिओ पाठवलाय. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तो पहावा. बीडमध्ये गेल्या काही वर्षात ज्या हत्या केल्या आहेत, त्या हत्यांमागे कोण आहे? कोणा-कोणाच्या हत्या झाल्या? त्या हत्या दाबल्या गेल्या. त्याची माहिती एका व्यक्तीने दिलीय. मी तो व्हिडिओ सोशल माध्यमातून लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवला आहे” असं संजय राऊत म्हणाले.
‘बीडमध्ये तुमचे जावई आहेत का?’
“आपण सच्चे गृहमंत्री असाल, तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोर आहेत की जावई आहेत का? ज्यांना अभय दिलं जातय. बीडमध्ये गेल्या काही वर्षात 38 हत्या झाल्या आहेत. या 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुतांश वंजारी समाजाचे आहेत. 29 तारखेला तिथे एक मोर्चा निघतोय, त्या मोर्चाला राजकीय स्वरुप देता येणार नाही, हा पीडितांचा मोर्चा आहे. संतोष देशमुखच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा. बीडमधला अर्बन नक्षलवाद संपवा तो त्यांचा आवडता शब्द आहे” असं संजय राऊत म्हणाले.
‘विरोधकांचा काटा काढण्यासाठी राज्याचे गृहमंत्री झालेला नाहीत’
“एक नाही, दोन मंत्री त्या भागातले, ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहेत, ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. कोणी भाजप, तर कोणी आजित पवार यांच्या मंत्रिमंडळात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेता, तुम्हाला लाज वाटते का? त्यांची नाव घ्यायला. असा महाराष्ट्र घडवा असं त्यांनी मार्गदर्शन केल्याच स्मरणात नाही. फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा, आपण कायद्याचे रक्षक आहात. विरोधकांचा काटा काढण्यासाठी राज्याचे गृहमंत्री झालेला नाहीत” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
‘लाडक्या बहिणींच कुंकू पुसणाऱ्यांना संरक्षण’
“परळी आणि आसपासच्या परिसरातील अनेक लाडक्या बहिणींच कुंकू पुसलं गेलेलं आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. तेव्हा देवा भाऊ, खरोखर त्यांचा भाऊ असेल, तर आपल्या लाडक्या विधवा बहिणींचा कायद्याने बदला घेईल. पण फडणवीस, अजित पवार हे लाडक्या बहिणींच कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्याना संरक्षण देत आहेत” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.