Aaj Che Havaman (आजचे हवामान): सावधान! थंडीच्या लाटेनंतर आता पावसासह गारपिटीचे सावट, आज 'या' जिल्ह्यात मुसळधारची शक्यता
Times Now Marathi December 26, 2024 04:45 PM

Aaj Che Havaman (आजचे हवामान): पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्याच्या हवामानावर देखील याचा परिणाम झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्यात भारताचा पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात आज म्हणजेच 26 डिसेंबर 2024 पासून सक्रिय पाश्चात्य झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्दता निर्माण होत आज आणि पुढचे दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील हवामानात सध्या कमालिचा बदल जाणवत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी पावसाचे सावट अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिमी झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ऐवढेच नाही तर काही भागात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. हवामान बदलाचा हा फटका शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

'या' 5 जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

हवामान बदलाचा फटका खान्देशाला अधिक बसला आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीपासून याठिकाणी थंडीचा जोर होता. मात्र, वातावरणातील बदलामुळे या भागातील थंडीचा जोर ओसरला आहे. किमान तापमानात वाढ झाली झाली आहे. त्यात आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी नाशिक धुळे, नंदुरबार, जळगावात तसेच छत्रपती संभाजीनगरात आज पावसाचा अंदाज असून या ठिकामी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढचे दोन दिवस 'या' भागात गारपीट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजसह पुढचे दोन दिवस देखील राज्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सावट कायम आहे. त्यानुसार, उद्या म्हणजे 27 डिसेंबर रोजी जळगाव, धुळे,नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम या भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

तर 28 डिसेंबर रोजी जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

कसं राहील मुंबईचे हवामान?

हवामान विभागाच्या अंदाजनुसार, मुंबई शहरात आज अकाश निरभ्र राहील. या ठिकाणी किमान तापमान 23.84 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले जाईल. तर कमाल तापमान 24.7 अंश सेल्सियस नोंदविले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यातील हवामानाविषयी बोलायचे झाल्यास पुणे व आसपासच्या परिसरात आज आणि पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहील. तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्यापासून तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आज पाऊस

नाशिकच्या किमान तापमानात वाढ होत थंडीचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी देखील या ठिकाणी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.