नांदेड : शहरात एक ते २५ डिसेंबर या कालावधीत आगीच्या १२ घटना घडल्याची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभरात (एप्रिल ते डिसेंबर) एकूण १५१ आगीच्या घटना घडल्या आहेत.
डिसेंबर महिन्यात घडलेल्या घटनांमध्ये बहुसंख्य आग शॉर्टसर्किट किंवा निष्काळजीपणामुळे लागल्याचे दिसून आले आहे. यामध्ये काही दुकानांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली. बुधवारी (ता. २५) लोहार गल्ली येथील बेंटेक्स ज्वेलरी दुकानाला लागलेली आग आणि त्यामधील लाखांचे नुकसान हे त्याचे उदाहरण आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, वर्षभरात घडलेल्या १५१ घटनांमध्ये मुख्यतः निवासी इमारती, व्यापारी संकुले, गोडाऊन, आणि वाहने यांचा समावेश होता.
महापालिकेने नुकतेच शहरातील फायर सेफ्टी व्यवस्थेच्या कडक तपासणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ३१० हॉस्टेल आणि अभ्यासिकांना यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच अग्निसुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
भीषण आगीत लाखोंचे नुकसानलोहार गल्ली परिसरात असलेल्या बेंटेक्स ज्वेलरीच्या दुकानाला लागलेल्या आगीत अंदाजे ७० ते ७५ लाखांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकाने सांगितले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जेसीबीच्या साहाय्याने तटभिंत पाडून आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. ही घटना बुधवारी सकाळी ८:३४ वाजता घडली. दुकानाच्या अंडर ग्राऊंडमध्ये अचानक आग लागल्याचे स्थानिकांनी पाहिले.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी के.एस. दासरे यांच्या नेतृत्वाखाली नीलेश कांबळे, मोहम्मद सादिक आणि पथकाने प्रयत्न करून १२ बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या कारवाईमुळे काही साहित्य वाचविण्यात यश आले. दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील घराला कोणताही धोका पोहोचला नाही. घटनेची नोंद पोलिसांकडून घेण्यात आली असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे.
शहरातील आगीच्या घटना
महिना घटना रेस्क्यू
एप्रिल २९ ०२
मे ४२ ०४
जून १६ ०२
जुलै ०८ ०१
ऑगस्ट ०३ ०७
सप्टेंबर ०६ ०५
ऑक्टोबर १२ ०२
नोव्हेंबर २३ ०
डिसेंबर १२ ०
नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. फायर सेफ्टी उपकरणांचा वापर आणि विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच अग्निशमन विभागाचे सर्व नियमांचे पालन करावे.
— के.एस. दासरे, अग्निशमन अधिकारी.