Maharashtra Politics News LIVE UPDATES : महाराष्ट्रातल्या शस्त्र परवान्यांच्या चौकशीची अंजली दामनिया यांची मागणी
Sarkarnama December 27, 2024 12:45 AM
Anjali Damania : महाराष्ट्रातल्या शस्त्र परवान्यांच्या चौकशीची अंजली दामनिया यांची मागणी

महाराष्ट्रातल्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीचे आदेश द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातलं पोस्ट त्यांनी एक्स खात्यावर शेअर केली आहे. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, गुंडांचा नाही, असेही अंजली दामनिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर, परवानाधारक शस्त्र वितरणावर आणि अवैध शस्त्रांच्या वापरावर अंजली दामनिया संतप्त आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे.

Shirdi : शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बनावट दर्शन पासचा प्रकार उघड; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सशुल्क दर्शन पासच्या नावाने फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी साई साईसंस्थानच्या प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचारी सागर आव्हाड याच्याविरोधात विविध कलमान्वये शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थांनच्या अधिकृत पासची साधर्म्य असलेला बनावट पास तयार करून भक्तांसह संस्थांनचीही फसवणूक उघड झाली असून यात आणखीही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. बनावट पास विक्रीप्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Balaji Kinikar : DCM शिंदेंचे शिलेदार, आमदार किणीकरांच्या हत्येचा कट; ठाणे पोलिसांकडून दोघांना अटक

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी ठाण्यातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. आमदार किणीकर यांना अंबरनाथच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आमदार किणीकर यांनी ठाण्याचे पोलिस अधीक्षकांची भेट घेत, प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले. ठाणे पोलिसांनी देखील आमदार किणीकर यांना हा प्रकाराबाबत दुजोरा दिला. दहा ते बारा दिवसांपासून, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आमदार किणीकर यांना दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पोलिस अधीक्षकांची देखील चर्चा केल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांत पाच ते सहा शिवसेना कार्यकर्त्यांचा हत्या झाल्या आहेत. आता माझ्या हत्येचा कट समोर आल्याने पोलिसांनी संरक्षणात वाढ केल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली.

Nashik Politics : राहुल कर्डिले यांच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीवर मंत्री गिरीश महाजन नाराज; अखेर मनीषा खत्री यांची वर्णी

नाशिक महापालिका आयुक्तपदी राहुल कर्डिले यांची नियुक्ती रोखण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन त्यांच्या नियुक्तीवर नाराज असल्याची चर्चा होती. राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्तीचा दोन दिवसांपूर्वी आदेश निघाले होते. आज ते पदभार स्वीकारणार होते. मात्र मंत्री गिरीश महाजन त्यांच्या नियुक्तीवर नाराज होते. त्यामुळे राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. मनीषा खत्री यांना आयुक्तपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. आता मनीष खत्री यांची आयुक्तपदी निश्चित देखील झाली आहे.

Eknath Shinde : DCM एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली मोदी-शाह यांची भेट

शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला, तरी मोदी-शिंदेंमधील ही दीर्घ चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंतर भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिंदे यांच्या या दिल्लीतील गाठीभेटीमुळे राज्यातील पालकमंत्रीपद वाटपाशी संबंध जोडला जाऊ लागला आहे. दिल्ली इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत देखील उपमुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते.

Dhananjay Munde : संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना फाशी द्या; मंत्री मुंडे म्हणाले, 'माझ्यावर 'मीडिया ट्रायल' सुरू आहे'

मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अन्न व नागरी पुरवठा विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर मंत्री मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या विभागात पारदर्शकता आणणार आहे. विभागाचा शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करून तो मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. तशा सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत". मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योगायोगाने भेट झाली. कोणतीही चर्चा झालेली नाही. माझी जिथं बैठक होती, तिथेच मुख्यमंत्री फडणवीस होते. तथापि, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मताचा मी आहे, असे मंत्री मुंडे यांनी म्हटले. तसेच 'वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याबरोबर देखील होती. आता माझ्याबरोबर देखील ते आहेत. यात कोणाचीही चौकशी करा. गतीने करा. जलदगती न्यायालयात हा खटला चालवा. आरोपी माझ्याजवळचा असला, तरी चौकशी तो निष्पन्न झाल्यास, त्याला फाशी द्या. परंतु माझ्यासारख्याला माध्यमांमध्ये ट्रायल केले जात आहे. त्यांचा उद्देश काय असू शकतो? याचा पण शोध घ्या. मला समाजकारण आणि राजकारणातून उठवायचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीपूर्वी देखील आणि आता देखील तसा प्रयत्न होत आहे', असा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

Dhananjay Munde : CM फडणवीस यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे अतिथीगृहावर दाखल

मंत्री धनंजय मुंडे CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अतिथीगृहावर दाखल झाले आहे. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. परंतु बीडमध्ये सीआयडीचे अप्पर महासंचालक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी पोचले असतानाच, मुंडे यांनी फडणवीस यांची भेटीसाठी पोचले आहेत. यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याची मागणी होत आहे. त्यामुळे ही भेट चर्चेत आली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी 'CID'चे अप्पर पोलिस महासंचालक दाखल

'सीआयडी'चे पोलिस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झाले असून, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना जिथं हत्या झाली, त्या घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. तसेच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहे. तसेच आत्तापर्यंतच्या तपासाची माहिती पोलिस अधीक्षक यांच्याकडून घेतली आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिस आणि 'सीआयडी'कडून सुरू असलेल्या तपासावर समाधान व्यक्त करताना, या गुन्ह्यातील मास्टरमाईंड लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड अन् परभणी दौरा करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड आणि परभणी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. दोन किंवा तीन जानेवारीला उद्धव ठाकरेंचा हा दौरा असणार आहे. बीडमधील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

Pankaja Munde : संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसाठी 'एसआयटी'ची मागणी माझी; पंकजा मुंडे म्हणाल्या, 'CM फडणवीस नक्की न्याय करतील'

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीवर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे. बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येत मुख्यमंत्री फडणवीस नक्की न्याय देतील. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी राज्यात सर्वात अगोदर एसआयटी लावण्याची मागणी मी केली होती. संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे".

Belgaum Congress Session 1924 : बेळगावमध्ये काँग्रेसचे आजपासून 'नव सत्याग्रह' बैठक; महात्मा गांधींच्या उपस्थित 1924 मध्ये झाले होते अधिवेशन

बेळगावात 1924 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवले होते. या घटनेला 100 वर्षे होत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने बेळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 200 नेत्यांचा सहभाग अधिवेशनात होईल. या बैठकीला ‘नव सत्याग्रह’ बैठक, असे नाव देण्यात आलं आहे. याच दिवशी रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारकाचा अनावरणाचा कार्यक्रम होईल. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. बेळगाव शहरातील चौका चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली असून महापुरुष आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळे विद्युत रोषणाईने साकारण्यात आली आहेत.

Sanjay Raut : बीडमध्ये गेल्या काही दिवसांत 38 हत्या; CM फडणवीसांच्या 'अर्बन नक्षल'वर राऊतांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा-सुव्यस्थेवरून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'अर्बन नक्षली'ची खूप चिंता आहे. 'अर्बन नक्षल' हा त्यांचा आवडतीचा शब्द आहे. मग बीडमध्ये काय घडतं आहे? तिथं काय तुमची पोरं आहे का? जावई आहे का? बीडमधील अर्बन नक्षलवादाला भाजपचे, आरएसएस किंवा देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण आहे का?" बीडमध्ये गेल्या काही दिवसांत 38 हत्या झाल्या आहेत. त्यात काही राजकीय कार्यकर्ते असून, ते वंजारी समाजाचे आहेत. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेले नाही. बीडमधील सर्व शस्त्र परवाने रद्द करावेत, जप्त करावेत. तिथं अवैध शस्त्र मोठ्याप्रमाणात आहे. ती नेपाळमधून आली आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Anjali Damania : CM फडणवीसांनी बीडमध्ये पर्यटनाला जावेच; अंजली दामनिया यांचा टोला

बीडमधील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावे, असा सल्ला सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. परंतु त्या घटनेच्या नावाखाली कोणीही पर्यटन करू नये, असा टोला लगावला होता. त्यावर अंजली दामनिया संतापल्या असून, बीडमधील गुन्हेगारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मित्र धनंजय मुंडे काय थैमान घालत आहेत, हे पाहण्यासाठी तरी बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यटनाला जावे, असा जोरदार टोला अंजली दामनिया यांनी लगावला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणासह तीन गुन्हे 'CID'कडे तपासासाठी वर्ग

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यासह खंडणी, सुरक्षा रक्षकाला मारहाणीचा गुन्हा 'CID'कडे वर्ग झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. या हत्येमधील प्रमुख मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. यात शरद पवार देखील सहभागी होणार आहे.

Eknath Shinde : DCM एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार

दिल्ली इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटक पक्षांची बैठक सुरू आहे. NDA च्या बैठकीचा दुसरा आज दुसरा दिवस असून, त्यात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहे. नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनानंतर एकनाथ शिंदे सातारा इथल्याच्या त्यांच्या दरे या मूळगावी चार दिवसांच्या मुक्कामावर गेले होते. तेथून ते काल मुंबईत दाखल झाले असून, आज पुढे दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Kalyan Rape Murder Case : विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला अटक; CM फडणवीसांच्या पोलिसांना फाशीपर्यंत नेणारा तपास करण्याच्या सूचना

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्याप्रकरणात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. ही घटना गंभीर असून, विकृताला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आरोपी विशाल गवळी याला त्याच्या पत्नीने मदत केली म्हणून, तिला देखील अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशाल गवळी यापूर्वी बलात्कार, विनयभंग आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती. तो तुरुंगातून पेराॅलवर बाहेर होता.

Sharad Pawar : शरद पवार पक्षात भाकरी फिरवणार; मुंबईत महत्त्वाची बैठकीचे आयोजन

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहे. यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आठ आणि नऊ जानेवारीला महत्त्वाची बैठक बोलवली आहे. पक्षातील खासदार,आमदार, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलवण्यात आले आहे. या बैठकीत पक्ष संघटनेतील प्रदेशाध्यक्षासह विविध पदाधिकाऱ्यांच्या बदलांवर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.