कर्णधार रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाचं नुकसान होताना दिसत आहे. कर्णधार आणि त्यात खराब फॉर्म त्यामुळे एक जागा उगाचच भरल्याची दिसत आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर चित्र बदललं. भारताला दुसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तिसऱ्या सामन्यातही पराभव जवळपास निश्चित होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पराभवाचं संकट टळलं असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. असं असताना चौथा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे रोहित शर्माकडून खूप अपेक्षा होत्या. सलग चार डावात फेल गेल्यानंतर पाचव्या डावात काहीतरी करेल अशी आशा होती. यासाठी मधल्या फळीतून सलामीला उतरला. पण त्याच्या फॉर्मात काही बदल झाला नाही. उलट लवकर विकेट देऊन टीम इंडियाला आणखी दबावात आणलं. कसोटीत पॅट कमिन्सने त्याला सातव्यांदा बाद केलं. कर्णधाराने कर्णधाराला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे.
आता भारताची लाज इतर खेळाडूंच्या हाती आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने एक खेळाडू म्हणून खेळावं, असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला होता. कौटुंबिक कारणामुळे रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी ही सल्ला दिला होता. मालिकेच्या मधेच आल्याने संघाचा ताल बिघडेल असं त्यांचं म्हणणं होतं. आता ते काही अंशी खरं ठरताना दिसत आहे. एकीकडे इतर खेळाडू चांगली कामगिरी करत असताना कर्णधार रोहित शर्मा मात्र काही खास करताना दिसत नाही.
चौथ्या कसोटी सामन्यात फक्त 5 चेंडूंचा सामना केला आणि 3 धावा करून बाद झाला. एकीकडे खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असूनही रोहित शर्माचा असा खेळ पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फॉर्मावरून कल्लोळ माजला आहे. इतकंच काय तर जसप्रीत बुमराहच्या विकेट या रोहित शर्मापेक्षा जास्त आहेत असं मिश्किल टोलेबाजी सोशल मीडियावर सुरू आहे. रोहित शर्माने 22 धावा, तर जसप्रीत बुमराहने 25 विकेट घेतल्या आहेत.