Gliding Center : वैमानिक होण्याचे स्वप्न महागणार
esakal December 27, 2024 12:45 PM

प्रसाद कानडे

पुणे : वैमानिकांना प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) हे सेंटर भारतीय विमानतळ प्राधिकरणाला ३१ डिसेंबरला हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे २५० एकर जागेत असलेल्या या सेंटरचे पुढे काय होणार, याचे उत्तर ना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे ना ‘डीजीसीए’कडे. विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात ही जागा आल्यावर त्याचे खासगीकरण होणार, अशी चर्चा आहे.

तसे झाल्यास आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाला उडण्याचे स्वप्न महागात पडू शकते. ग्लायडिंग सेंटरमधील एका उड्डाणाला अवघे १८७ रुपये आकारले जातात, तर उड्डाण प्रशिक्षण संस्थांमधील एका उड्डाणाला सुमारे १४ हजार रुपये आकारले जातात.

‘ग्लायडिंग सेंटर’चे महत्त्व
  • ‘ग्लायडिंग’च्या एका ट्रीपसाठी केवळ १८७ रुपयांचे शुल्क असते.

  • चांगला वैमानिक होण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण अगदी माफक दरात मिळते.

  • हवामानाच्या अभ्यासासोबतच आपत्कालीन परिस्थितीत काय केले पाहिजे, याचे प्रशिक्षण मिळते.

  • प्रशिक्षणार्थी वैमानिकांना लेखी, तोंडी अभ्यासक्रमासही प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण.

    ६ महिने ते २ वर्षांचा अभ्यासक्रम.

  • उच्च दर्जाचे प्रशिक्षक. वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अवघा ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च.

व्यावसायिक वापर होणार

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही जागा आपल्या ताब्यात आल्यावर तेथे काय करायचे हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र विमानतळ प्राधिकरण या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार करीत आहे. यात काही ऐरो स्पोर्टपासून ते हॉटेल, रेस्टॉरंटशिवाय एखादे संग्रहालय करण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र तसे झाल्यास येथे सुविधा उपलब्ध होतील, मात्र त्यासाठी जास्तीचे पैसेदेखील मोजावे लागतील. एखादे खासगी संस्थाकडून वैमानिकांना प्रशिक्षण मिळेल. मात्र त्यासाठी त्यांना आताच्या तुलनेत जास्तीची रक्कम मोजावी लागणार, हे निश्चित आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण या जागेचा वापर पीपीपी तत्त्वानुसार करणार आहे. हे एक प्रकारचे खासगीकरणच आहे. ग्लायडिंग सेंटरमध्ये अगदी माफक दरात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. खासगीकरण झाल्यास हे प्रशिक्षण नक्कीच महाग होईल. म्हणून या निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय रद्द व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ हजार विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिली आहेत.

- योगेश ससाणे, माजी नगरसेवक

देशातील १७ सेंटर बंद

देशाला स्वातंत्र मिळाल्यावर हवाई क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशात १८ ठिकाणी ग्लायडिंग सेंटर सुरू झाली. हेतू हाच की वैमानिकाचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीलादेखील वैमानिकाच्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च कमीत कमी व्हावा. काळाच्या ओघात १८ पैकी १७ ग्लायडिंग सेंटर बंद झाली. देशात आता हडपसर येथील एकमेव ‘ग्लायडिंग सेंटर’ सुरू आहे. याला सरकारचे अनुदान असल्याने वैमानिकाला ‘ग्लायडिंग’च्या एक उड्डाणासाठी अवघे १८७ रुपये मोजावे लागतात.

वैमानिकाला व्यावसायिक परवाना मिळण्यापूर्वी त्यांना ‘ग्लायडिंग’चे प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी वैमानिकांना ‘ग्लायडिंग’ उड्डाणाचा अनुभव असल्याने ते उत्कृष्ट वैमानिक बनतात. मात्र याच ‘ग्लायडिंग सेंटर’चे भवितव्य अनिनिश्चिततेच्या अवकाशात घिरट्या मारत आहे.

या ठिकाणी खासगी ‘उड्डाण प्रशिक्षण संस्था’ स्थापन करण्याच्या चर्चा आहेत. तसे झाल्यास येथे काही प्रमाणात सुविधा उपलब्ध होतील, मात्र त्या बदल्यात वैमानिक होण्याचे स्वप्न चांगलेच महागणार आहे.

कसे आहे ग्लायडिंग
  • विना इंजिनचे छोटे विमान

  • वेग ताशी ३० ते ४० नॉटिकल

  • सुमारे ३ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण

  • वजन : २०० किलो

  • हवाईक्षेत्र : ५ नॉटिकल

  • एका वेळी दोन जण प्रवास करू शकतात.

ग्लायडिंग सेंटर विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आल्यावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. लवकरच मी ग्लायडिंग सेंटरला भेट देणार आहे. तिथे काय करायचे हे अद्याप ठरलेले नाही. सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.