शिक्षकांच्या पगारासाठी तिजोरीत नाही पैसा! नववर्षात शिक्षकांना पगारासाठी पाहावी लागणार वाट; दरमहिन्याला लागतात सरासरी ५५०० कोटी रुपये
esakal December 27, 2024 01:45 PM

सोलापूर : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्राथमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः २५ तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर १ ते ५ तारखेपर्यंत पगार वितरित होतो. पण, आता २७ तारीख उजाडली तरीदेखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, अनुदानित खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे.

शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी शासनाला तिजोरीतून ६५ ते ७० हजार कोटी रुपये (दरमहा सरासरी पाच हजार ५०० कोटी) द्यावे लागतात. पण, सध्या तिजोरीची स्थिती बिकट झाली असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने ‘आरबीआय’ची मंजुरी घेतली आहे. त्यातील ६० हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज यापूर्वीच उचलले आहे. आता रखडलेले प्रकल्प, शासकीय योजनांसाठीचा निधी,‘ लाडक्या बहिणीं’साठी पैसे द्यायला तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरित झालेले नाही.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार होणार उशीरा

सोलापूरचे खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे म्हणाले, की पावणेतीन हजार शिक्षकांसाठी दरमहा २५ कोटी रुपयांचा निधी लागतो. तो निधी २५ तारखेपर्यंत आल्यास पाच तारखेपर्यंत पगार करता येतो. माध्यमिकचे वेतन अधीक्षक म्हणाले, आमच्याकडील १५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १०५ कोटी लागतात. अजून सरकारकडून वेतनासाठी अंशदान न आल्याने वेतन उशीरा होईल. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नऊ हजार १०० शिक्षक असून त्यांच्या पगारीसाठी दरमहा ८५ कोटी रुपये लागतात. पगारबिले तयार आहेत, निधी आल्यावर शिक्षकांचे वेतन होईल.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची प्रतीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १५ हजारांपर्यंत आहे. त्यांच्या पगारासाठी दरमहा १०५ कोटी रुपये लागतात. २५ तारखेपर्यंत पगारासाठी अंशदान अपेक्षित होते. पण अजून निधी मिळालेला नाही. त्यामुळे पगारासाठी काही दिवसांचा विलंब लागू शकतो.

- दत्तात्रेय मुंडे, वेतन अधीक्षक (माध्यमिक), सोलापूर

राज्यातील शिक्षक अन् पगाराची स्थिती

  • शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी

  • ४.५० लाख

  • दरवर्षी पगारासाठी निधी

  • ६८,००० कोटी रु

  • दरमहा लागणारा निधी

  • ५,५०० कोटी रु

  • दरमहा पगाराची तारीख

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.