Nashik : नायलॉन मांजाचा फास, गळा चिरून २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू
Saam TV January 15, 2025 12:45 AM

Nylon Manja Sale In Nashik : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे नाशिक शहरात दररोज एखादा तरी दुचाकीस्वाराचा गळा, हात कापल्याने रक्तबंबाळ झाल्याच्या घटना घडत आहेत. केवळ माणूसच नाही तर पक्षीदेखील मांजाच्या जाळ्यात अडकून जखमी होत आहेत. आज नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा जीव गेलाय. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे पीएसआयचाच गळा चिरला गेलाय. उपचारासाठी रूग्णलयात दाखल करण्यात आलेय, पण प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जातेय. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून नायलॉन मांजाविरोधात प्रशासनाने आक्रमक पावले उचलली आहेत, पण तरीही शहरात नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाण तसेच आहे.

संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाचा वापर करत अनेकजण पतंग उडवतात. पण हाच नायलॉन मांजा जिवावर उठलाय. नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये एकाचा मृत्यू झालाय. सोनू किसन धोत्रे असं नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरातील आज ही घटना घडली. सोनू याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांकडून सांगण्यात आलेय. सोनू याच्या जाण्याने धोत्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

नाशिक पोलिसांची करडी नजर -

आज मकर संक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजावर नाशिक पोलिसांची करडी नजर आहे. नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी पालिसांनी विशेष पथक तयार केले आहे. नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी पोलिसांच्या ३१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर, छोट्या छोट्या गल्ली आणि मैदानावर पोलीस पथक मारणार धडक आहेत.

थेट सदोष मनुष्य वधाचा गुन्हा, सात पालकांना बेड्या -

नायलॉन मांजा वापरत असल्याचं आढळून आल्यास थेट सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल होणार आहे. आतापर्यंत नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात ५० गुन्हे दाखल केले आहेत. नायलॉन मांजा वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या ७ वडिलांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे, पण तरीही नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरत पतंग उडवला जातोय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.