Sanjay Raut Latest News : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हटवण्यात यावे, असा ठराव शिंदेंच्या शिवसेनेनं सोमवारी झालेल्या बैठकीत केला आहे. हा ठराव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना काढा असं बोलताना यांच्या जीभा झडत का नाही? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : या महाराष्ट्रात अमित शहांनी XX आणि गांडुळांची पैदास, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
संजय राऊत म्हणाले, “ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. दिल्लीचे बूट चाटणे आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम हा शिंदे गट करत आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आमचे काय संबंध होते, हे यांनी समजून घेतले पाहिजे. आता जे पाळलेले पोपट फडफड करत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची शकले उडवून यांनी महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केले आहे.”
“अमित शहा रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलले आणि पिचकाऱ्या टाकून गेले, हे शिंदे गटाला मान्य असेल, तर ते महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. हातात सत्ता आणि पैसा आहे, म्हणून त्यांची ही मस्ती चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना काढा असं बोलताना यांच्या जीभा झडत का नाही?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
रामदास कदम काय म्हणाले होते?
“उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दु:ख होईल. त्यंच्या मनाला वेदना होतील, असं शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीनंतर रामदास कदम यांनी म्हटलं होते.
हेही वाचा : आरोपींना फाशी द्या, धनंजय देशमुख यांची मागणी