'चराईदेव मोईदम' ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
Marathi January 15, 2025 10:25 AM

आसामधील पिरॅमिड अशी ओळख :

वृत्तसंस्था/ पॅरिस

युनेस्कोने आसाममधील चराइदेव मोईदामला जागतिक वारसास्थळ घोषित केले आहे. आसामचे सांस्कृतिक मंत्री विमल बोरा यांनी पॅरिस येथे हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हे प्रमाणपत्र ‘मोईदाम-अहोम राजघराण्याच्या माउंड बुरियल प्रणाली’साठी देण्यात आले आहे. युनेस्कोचे सांस्कृतिक सहाय्यक संचालक जनरल एर्नेस्टो ओट्टोन रामिरेज यंनी भारताचे फ्रान्समधील राजदूत विशाल शर्मा यांच्या उपस्थितीत हे प्रमाणपत्र प्रदान केले.

आसामसाठी हा गर्वाचा क्षण असल्याचे म्हणत बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि राज्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहेत. या दोन्ही नेत्यांचे समर्थन अन् प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मकर संक्रांतीच्या पावन दिनी युनेस्कोकडून चराइदेव मोईदामला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. 2024 हे आसामसाठी चांगले वर्ष होते आणि 2025 हे आणखी चांगले वर्ष ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री शर्मा यांनी काढले आहेत.

ईशान्येतील पहिले स्थळ

जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले चराइदेव मोईदाम हे ईशान्येतील पहिले सांस्कृतिक स्थळ ठरले आहे. जुलै महिन्यात भारतात पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 व्या बैठकीतच यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. ईशान्येतील काझीरंगा अन् मानस राष्ट्रीय उद्यानालाही जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त आहे. जागतिक वारसास्थळांना सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र श्रेणींमध्ये विभागण्यात येते.

चराइदेव मोईदाम काय आहे?

गवताच्या ढिगांसारख्या दिसणाऱ्या चराइदेव मोईदामला अहोम समुदायाकडून पवित्र मानले जाते. प्रत्येक मोईदाम एक अहोम शासक किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचे विश्रांतीचे स्थळ मानले जाते. तेथे त्यांच्या अवशेषांसोबत मूल्यवान कलाकृती तसेच खजिना संरक्षित आहे. चराइदेव मोईदाममध्ये मृतांच्या अवशेषांना एका भूमिगत कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यावर एक टेकडीसारखी संरचना किंवा स्मारकाची निर्मिती केली जात होती. मोईदाम आसामी ओळख आणि वारशाच्या समृद्ध परंपरेला दर्शविते. चराइदेव मोईदामला आसामचे पिरॅमिड देखील म्हटले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.