नवी दिल्ली : आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा तसेच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या फोटो-व्हिडिओचा विपर्यास केल्याच्या आरोपांवरुन गुन्हे दाखल केल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना तसेच सत्ताधारी आम आदमी पक्ष(आप) कचाट्यात सापडला आहे.
मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक साहित्य पोचविण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर केल्याच्या आरोपावरुन निवडणूक अधिकाऱ्याने त्यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो आणि व्हिडिओंचा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने विपर्यास करून ते समाज माध्यमांवर टाकल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ई-मेल धमक्यांचा ‘आप’शी संबंध?दिल्लीतील शाळा बॉम्बस्फोट करून उडविण्याच्या धमक्या देणाऱ्या ई-मेलमागे एका स्वयंसेवी संस्थेचा संबंध असून या संस्थेने अफजल गुरुच्या फाशीचा विरोध केला होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या ई-मेलमागे दहशतवादी संघटना असाव्यात, असा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. या स्वयंसेवी संस्थेचा ‘आप’शी संबंध असल्याचा दावा भाजपने केला.
स्वाती मालीवाल पुन्हा आक्रमकदिल्ली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झालेल्या कथित मारहाणीचा जुना मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आणून आपच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांची व माझी नार्को, पॉलिग्राफ चाचणी करावी, अशी मागणी केली आहे. मी खोटे बोलल्याचे सिद्ध झाल्यास फाशी द्या, असे म्हणत हे प्रकरण निवडणुकीतही चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
‘आप’ पुन्हा आयोगाकडेपैसे, चष्मे आणि ब्लँकेट वाटल्याच्या प्रवेश वर्मा यांच्यावरील आरोपाची निःपक्ष चौकशी झाली नाही म्हणून आज ‘आप’चे शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयोगाकडे गेले. दिल्ली विधानसभा मतदार संघाशी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रभारींना हटविल्याशिवाय निःपक्ष चौकशी होऊ शकणार नाही, असे ‘आप’चे संजय सिंह म्हणाले.