आजकाल केस अकाली पांढरे होणे, हा एक चिंतेचा विषय बनला आहे. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपाय काय करावा, याविषयीची माहिती देणार आहोत. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती फक्त जाणून घ्यायची आहे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करायचे आहेत. जाणून घेऊया.
एकेकाळी केस पांढरे होणे हे वयाशी निगडित मानले जात होते, परंतु आजकाल ही एक सामान्य समस्या आहे. आता लहान वयातच लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. लहान वयातच मुलांचे केसही पांढरे होतात हे आपण पाहतो. केस पांढरे होण्यामुळे आपल्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो. अशा वेळी त्यांची वेळीच काळजी घेऊन ही समस्या मुळापासून दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी काही उपाय तुम्हाला मदत करतील.
बहुतांश आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आयुष्यात तणाव वाढला की आरोग्याबरोबरच केसांचेही नुकसान होते. मात्र काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता आणि नैसर्गिकरित्या केस पुन्हा काळे करू शकता.
मेलेनिन रंगद्रव्य आपल्या केसांच्या मुळांच्या पेशींमध्ये आढळते आणि हे आपले केस काळे करण्याचे काम करते. जेव्हा मेलेनिनचे उत्पादन कमी होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. अशा वेळी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे
आवळ्याव्यतिरिक्त मेथी नैसर्गिकरित्या केस काळे करू शकते. मेथीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे केस काळे ठेवण्यास मदत करतात. त्याचा वापर करण्यासाठी दोन चमचे मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते बारीक करून केसांच्या मुळांना लावावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते नारळ किंवा बदामाच्या तेलात मिसळून केसांमध्ये हेअर पॅक म्हणून वापरू शकता.
केसांच्या आरोग्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे केस मजबूत करण्यासाठी, काळे राखण्यासाठी आणि पडण्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक घटक आहेत. मेहंदीसोबत आवळ्याचा वापर करता येतो. ताज्या आवळ्याचा रस तुम्ही केसांच्या मुळांना लावू शकता. त्याच्या पावडरची पेस्ट बनवून ही वापरू शकता.
केसांच्या आरोग्यासाठी चहाची पाने अत्यंत फायदेशीर असतात. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. सर्वप्रथम चहाची पाने पाण्यात उकळून थंड होण्यासाठी ठेवावीत. पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावून थोडा वेळ मसाज करावा. साधारण तासाभरानंतर सामान्य पाण्याने केस धुवून टाका. यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करायलाच हवा.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)