नाराज भुजबळ राष्ट्रवादीची साथ सोडणार का? अजितदादाच्या शिलेदारानं सांगितली आतली गोष्ट
GH News December 27, 2024 06:12 PM

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांची देखील वर्णी मंत्रिमंडळात लागली, त्यांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय देण्यात आलं. दुसरीकडे महायुतीमध्ये आधी मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मात्र नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले झिरवाळ?  

मी भुजबळ साहेबांना भेटलो, नागपूरला रात्री भेट झाली. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज नाहीत तर वागणूक पटली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. राज्यसभा देण्याचा विचार सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर बोलतान ते म्हणाले आता असं कसं म्हणता की राज्यसभा देतो. जनतेची आणि आमची हेळसांड होणार नाही याचा विचार करा, असं भुजबळ यांनी म्हटल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काहीतरी महायुतीचे नेते ऍडजस्ट करतील असा मला विश्वास आहे. भुजबळांना बाजूला ठेवणे कुणालाही परवडणारे नाही, ते भाजपात जाणार नाहीत,  भुजबळ साहेब दादा सोबतच राहतील.  त्यांना ओळखणं फार अवघड असल्याचं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं आहे. मात्र पालकमंत्री पदाचं वाटप रखडलं आहे. यावर देखील झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ विस्तार झाला, खाते वाटप झालं. हे चालूच राहातं. समन्यायी वाटप होईल, काहीही होऊ शकतं. मला जर पालकमंत्रिपद मिळालं तर कुठलंही चालेल. मला गोंदिया दिलं तरी चालेल असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.