नव्या वर्षात सण येणार 15 दिवस आधीच; ऑगस्टमध्ये गणेश चतुर्थी, तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम-आषाढी कधी?
esakal December 27, 2024 08:45 PM

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी येणार आहेत. सहा जुलैला आषाढी एकादशी व मोहरम आहे.

कोल्हापूर : नव्या वर्षाची (New Year 2025) चाहूल लागताना दिनदर्शिकेवर सण कधी, कोणत्या तारखेला येतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. विशेषतः (Ganesh Chaturthi), नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे मोठे सण कोणत्या महिन्यात येतात, हे आवर्जून पाहिले जाते. २०२५ या नव्या वर्षात सर्वच सण सरासरी दहा ते बारा दिवस आधीच येत आहेत. लाडक्या गणरायाचे आगमन एरवी सप्टेंबर महिन्यात होते, तर यंदा ऑगस्ट महिन्यात गणपतीबाप्पांचे घरोघरी आगमन होणार आहे.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे समीकरण ठरलेलेच असते. अधिक महिना असल्यास सण एका महिन्याने पुढे जातात आणि आनंदोत्सवाने भरलेल्या सणांची प्रतीक्षा करावी लागते. यंदा मात्र चित्र पालटले असून दहा ते पंधरा दिवस आधीच सर्व सण उत्साहात साजरे होणार आहेत. वर्षाची सुरुवात परंपरेप्रमाणे मकर संक्रांतीने (Makar Sankranti) होणार आहे. यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे. मार्चच्या अखेरीस येणारा होळीचा सण पहिल्या पंधरवड्यातच आहे. तर गुढीपाडवाही मार्चमध्येच साजरा होणार आहे.

श्रावण महिन्यापासून (Shravan) सणांना प्रारंभ होतो. हाच महिना जुलैच्या अखेरीस सुरू होणार आहे. नागपंचमी (ता. २९ जुलै), रक्षाबंधन (९ ऑगस्ट) तर जन्माष्टमी १५ ऑगस्टला साजरी होईल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जून या महिन्यांमध्ये दोन सण आले आहेत. तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चार आणि नोव्हेंबरमध्ये तीन सण आले आहेत.

आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी येणार आहेत. सहा जुलैला आषाढी एकादशी व मोहरम आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान मुस्लिम समाजाचा सण ईद साजरा होणार आहे. पाच सप्टेंबरला ईद व सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईदही लागोपाठ असून ३० मार्चला गुढीपाडवा तर ३१ मार्चला रमजान ईद साजरी होईल.

  • भोगी (१३ जानेवारी) सोमवार

  • मकर संक्रांत (१४ जानेवारी) मंगळवार

  • महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) बुधवार

  • होळी (१३ मार्च) गुरुवार

  • रंगपंचमी (१९ मार्च) बुधवार

  • गुढीपाडवा (३० मार्च) रविवार

  • वटपौर्णिमा (१० जून) मंगळवार

  • कर्नाटकी बेंदूर (१२ जून) गुरुवार

  • आषाढी एकादशी (६ जुलै) रविवार

  • श्रावण महिना प्रारंभ (२५ जुलै) शनिवार

  • नागपंचमी (२९ जुलै) मंगळवार

  • रक्षाबंधन (९ ऑगस्ट) शनिवार

  • श्रीकृष्ण जन्माष्टमी (१५ ऑगस्ट) शुक्रवार

  • श्री गणेश चतुर्थी (गणेश आगमन २७ ऑगस्ट) बुधवार

  • गौरी आवाहन (३१ ऑगस्ट) रविवार

  • गौरी पूजन (१ सप्टेंबर) सोमवार

  • घरगुती गणेश विसर्जन (२ सप्टेंबर) मंगळवार

  • अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) शनिवार

  • घटस्थापना (२२ सप्टेंबर) सोमवार

  • दसरा (२ ऑक्टोबर) गुरुवार

  • नरक चतुर्दशी (दीपावली) (२० ऑक्टोबर) सोमवार

  • लक्ष्मी पूजन (२१ ऑक्टोबर) मंगळवार

  • दिवाळी पाडवा (२२ ऑक्टोबर) बुधवार

  • भाऊबीज (२३ ऑक्टोबर) गुरुवार

  • तुलसी विवाह (२ नोव्हेंबर) रविवार

  • दत्त जयंती (४ डिसेंबर) गुरुवार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.