Santosh Deshmukh Murder Case : ‘मी अजित पवारांना सांगितलेलं, यांना…’ संभाजीराजेंचा संताप
GH News December 28, 2024 02:09 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात मूक मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेते, आमदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. माजी खासदार संभाजीराजे सुद्धा या मोर्चासाठी आले आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना संभाजीराजे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. “हे दुर्देवी आहे, क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे वेदनादायी आहे. वाईट आहे, जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही” असं संभाजी राजे म्हणाले. “वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते” अशा शब्दात संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा रोख धनंजय मुंडेंकडे होता.

“पंकजा मुंडे म्हणालेल्या की, वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. अनेक व्यवहारात त्यांची भागीदारी आहे. वाल्मिक कराड कुठे लपला आहे, ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही मंत्री म्हणून अटक करण्याची जबाबदारी घेत नाही. मुख्यमंत्री म्हणतात मोक्का लावणार ते चालणार नाही. तात्काळ अटक करा, मोहरक्या वाल्मिक कराडला आत कसं घेणार, त्यावर बोला” अशा शब्दात संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला.

‘बीड बिहारसारखं करायचं आहे का?’

समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना काही व्हॉइस मेसेज आले, त्यात उरलेल्या तीन आरोपींची मर्डर झालीय असं सांगण्यात आलं. त्यावर संभाजीराजे म्हणाले की, “हा विषय संवेदनशील असल्यामुळे या मिनिटाला भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी जे स्टेटमेंट केलय, त्या संदर्भातील माहिती एसपींकडे दिलीय” “आज महाराष्ट्र किंवा बीड बिहारसारखं करायचं आहे का?” असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

‘हा कुठल्या जातीचा मोर्चा नाही’

“माझी पहिली मागणी, मी महाराष्ट्रातला एकमेव नेता होतो, मी स्पष्टपणे सांगितलेलं, अजित पवारांना सांगितलेलं यांना मंत्रिपद देऊ नका. आज अजित पवारांसमोर गोष्टी आहेत. हा कुठल्या जातीचा मोर्चा नाही, तरी तुम्ही यावर का बोलत नाही?” असं संभाजीराजे म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.