Parbhani Crime: तिसऱ्यांदाही मुलगीच झाली. तेव्हापासून या पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची. 26 डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरुन भांडण सुरू झालं. संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली. बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला. एवढाश्या पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळू लागली आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली.
या घटनेनंतर मयत महिलेच्या बहिणीने आपल्या भाऊजींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.
आगीच्या विळख्यात सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोवर ही महिला गंभीररित्या भाजली होती. ती बेशुद्ध पडली. या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली. गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र तोवर खूर उशीर झाला होता. तिनं 3 मुलींना अनाथ करुन हे जग सोडलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलिक काळे आणि त्याच्या पत्नी मुलींसह वास्तव्यास होते. कुंडलिक काळे यांना त्यांच्या पत्नीपासून सुरूवातीला दोन मुली होत्या. या दोन मुलींच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीला पुन्हा मुलगीच झाली होती. त्यामुळे कुंडलिक काळे प्रचंड रागावले होते आणि नाराज झाले होते.
याच नाराजीतून आणि रागातून कुंडलिक काळेने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जळालेल्या अवस्थेत असलेल्या महिलेने स्वत:ला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नव्हते. त्यानंतर एका माणसाने चादरीच्या सहाय्याने तिच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा एक माणूस देखील तिच्या बचावासाठी धावला होता. मात्र तिथपर्यंत ती अर्धी जळून कोळसा झाला होती. या घटनेत तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये मयत मैना काळे हिच्या बहिणीने तशी तक्रार दिली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी कुंडलिकला ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून तपासाअंती नेमका काय प्रकार झाला होता हे समजेल असे सांगितले आहे. मयत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही तसा गुन्हा नोंद केल्याचे देखील त्यांनी सांगितलं.