Mumbai Accident: भरधाव टेम्पोची सहा जणांना धडक, महिलेचा मृत्यू
esakal December 28, 2024 03:45 PM

Mumbai Latest News: कुर्ला बेस्ट अपघात ताजा असताना शुक्रवारी (ता. २७) संध्याकाळी भरधाव मालवाहू टेम्पोने घाटकोपरच्या चिरागनगर येथील बाजारपेठ परिसरात सहा पादचाऱ्यांना धडक दिली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पोचालक बबन खरात (वय २५) याला अटक केली आहे.

मिरगीचा झटका आल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटले, असा आरोपी चालकाचा दावा तपासला जाईल, सोबत अपघात घडला तेव्हा तो दारूच्या नशेत होता का, हेही तपासले जाईल, असे उपायुक्त विजयकांत सागर यांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यातील प्रीती रितेश पटेल (वय ३५) यांचा मृत्यू झाला. त्या पारशीवाडी येथील भागीरथी चाळीतील रहिवासी होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार रेश्मा शेख (वय ३०), अरबाज शेख (वय २३), मारूफा शेख (वय २७), तोफा उजहर शेख (वय ३८) आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख (वय २८) या पादचाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्याचे पोलिस आणि पालिकेकडून सांगण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.