Mumbai Metro: मेट्रो 4 आणि 6 प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर, मार्गिका कधी सुरू होणार?
Times Now Marathi December 31, 2024 01:45 AM
Mumbai Metro 4 and Metro 6 updates: मुंबई आणि ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण, मुंबईतील आणखी दोन मेट्रो प्रकल्पांच्या संदर्भात अपडेट आली आहे. मुंबई मेट्रो 4 वडाळा ते कासारवडवली, मेट्रो 4 अ कासारवडवली ते गायमुख यासोबतच मेट्रो 6 स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मार्गिकांसाठी गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. या निविदांना तब्बल 11 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर लार्सन अँड टुब्रो लि. एनसीसी लि. आणि सीआरआरसी नांजिंग पुझेन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो लि. एनसीसी लि. या कंपन्यांनीही मेट्रो डब्बे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत.
एमएमआरडीएने मेट्रो 4 या 32.32 किमी लांबीच्या आणि मेट्रो 4अ या 2.7 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदीसाठी फेब्रुवारीमध्ये निविदा काढल्या होत्या. यामध्ये एकूण 39 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत त्यासाठी एमएमआरडीएने 4297 कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या होत्या.
हे पण वाचा :
मेट्रो 4 आणि मेट्रो 6 कधी सुरू होणार?MMRDA ने यापूर्वी मेट्रो 4मार्गिकेसाठी 39 मेट्रो गाड्यांच्या खरेदीसाठी मार्च 2021 मध्ये बॉम्बार्डियन ट्रान्सपोर्टेशन कंपनीला 1854 कोटी रुपयांना कंत्राट दिले होते. मात्र, त्यावेळी मेट्रो कारशेडच्या जागेवरुन तिढा असल्याने बॉम्बार्डियन कंपनीने मेट्रोचे डब्बे पुरवण्याबाबत अनिश्चितता असल्याचं जानेवारी 2022 मध्ये एमएमआरडीएला कळवले. आता नव्याने निविदा दाखल झाल्याने मेट्रो मार्गिका सुरू होण्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
असा आहे मेट्रो 4 प्रकल्प
- वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील.
- सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल.
- सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
- सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
- स्टेशन्स - 1. भक्तीपार्कमेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली
असा आहे मेट्रो 6 प्रकल्प
- मेट्रो मार्ग-6, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (EEH) दरम्यान बृहन्मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुविधा प्रदान करण्यासाठी प्रस्तावित आहे.
- सदर मेट्रो मार्ग 15.31 किमी लांबीचा आहे आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (EEH) जोगेश्वरी, WEH, पवईमधून जाणारा आहे.
- हा मार्ग पूर्णपणे उन्नत आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणी प्रदान करणारा आहे.
- या मार्गामुळे मार्ग 2अ चे आदर्श नगर, मार्ग-7 चे JVLR स्टेशन, मार्ग-3 चे आरे डेपो स्टेशन आणि मार्ग-4 चे गांधीनगर स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंतरबद्दल सुविधा मिळेल .
- सदर मेट्रो मार्गामध्ये 13 स्थानके आहेत आणि बहुतांश संरेखन जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या मध्यभागातून जात आहे.
- इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच यात एकात्मिक तिकीट प्रणाली, लिफ्ट्स, एस्केलेटर आणि पायऱ्यांच्या सुविधा यासोबतच दिव्यांगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुधारित फूटपाथची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.
- अतिरिक्त वाहतूक सुविधा प्रदान करण्यासाठी S.S.नगर ते महाकाली दरम्यान 4.750Km (अंदाजे) पैकी 2.58Km चा मेट्रो मार्ग व रोड फ्लायओव्हर देखील एकत्रितपणे त्याच सिंगल पिअरवर रस्त्याच्या मध्यभागी बृहन्मुंबईच्या सहकार्याने बांधला जाईल.
- या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान कोणत्याही महत्त्वाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील किंवा पुरातत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रावर थेट परिणाम होणार नाही.
- अंधेरी ते (पूर्व द्रुतगती महामार्ग) EEH दरम्यान 30-45 मिनिटांच्या प्रवासी वेळेची बचत हा मुख्य फायदा आहे.