अमरावती : विधानसभा निवडणुकानंतर राज्यात ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त करत थेट निवडणूक निकालास चॅलेंज दिले जात होते. महायुतीचा विजय हा ईव्हीएमचा विजय असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, आता हा मुद्दा मागे पडला असताना प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. कडू यांनी एका गावातील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावातील नागरिकांनीही ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे सांगत फेरमतदानाची प्रक्रिया सुरू केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मारकडवाडी गावात आपणास मतदान कमी पडल्याचं म्हटलं होतं. तसेच, तेथील गावकऱ्यांशी बोलून एवढे मतदान कमी कसे झाले, यावर चर्चा केली होती. त्यानंतर,मारकडवाडी गावात ग्रामस्थांकडूनच फेरमतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारत गावात कलम 144 लागू केल होते. आता, बच्चू कडू निवडणूक लढवत असलेल्या अचलपूर मतदारसंघातील गावात मला मतदान कमी झाल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचं ते सांगत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच, या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ, असेही ते म्हणाले.
माझं मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे. मात्र, आता व्हीव्हीपॅट म्हणजे वरलीचा खेळ झाला आहे. त्यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ, कोर्टही बदमाश आहे, कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही. पण आम्ही कोर्टात जाऊ असेही बच्चू कडू यांनी म्हटलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून महायुतीच्या नेत्यांनाही त्यांचा एवढा मोठा विजय झाल्यावर विश्वास नसल्याचे स्वत: शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
”प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही”
अधिक पाहा..