इम्फाळ : वांशिक हिंसाचाराच्या ज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करतानाच राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह यांनी आज जनतेची माफी मागितली आहे. सरत्या वर्षाचा शेवट हा एका आशावादाने होत असून नव्या वर्षात राज्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बिरेनसिंह म्हणाले की हे सरते अवघे वर्ष अत्यंत दुर्दैवी ठरले आहे.
मागील तीन मेपासून राज्यामध्ये जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो. राज्यातील हिंसाचारामध्ये अनेकांनी त्यांच्या निकटवर्तीयांना गमावले आहे. अनेकांना बेघर व्हावे लागले. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल मला कमालीचा पश्चात्ताप होत असून त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. मागील तीन ते चार महिन्यांतील घडामोडी पाहता राज्याची शांततेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
नव्या वर्षामध्ये राज्यात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा आपण बाळगू शकतो. मी सर्वच समुदायांना आव्हान करतो की जे झाले ते झाले. भूतकाळातील चुका विसरून जात तुम्ही परस्परांना माफ करायला हवे. आपण शांततामय सहजीवनाची सुरूवात करायला हवी, मणिपूरच्या उन्नतीसाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे.
राज्यातील ३५ विविध समुदायांनी शांततेमध्ये जीवन जगायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान मणिपूरमध्ये मागील मे महिन्यापासून उसळलेल्या हिंसाचारामध्ये १८० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक बेघर झाले आहेत.