Santosh Deshmukh Murder : वाल्मीक कराड पोलिसांसमोर हजर; खंडणीप्रकरणी पुणे 'सीआयडी'कडून बीडच्या पथकाकडे ताबा
esakal January 01, 2025 09:45 AM

पुणे : बीड जिल्ह्यातील केज पोलिस ठाण्यात दाखल दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पुण्यातील मुख्यालयात मंगळवारी (ता. ३१) दुपारी हजर झाला. ‘सीआयडी’च्या पथकाने पुढील तपासासाठी त्याला सायंकाळी बीड सीआयडी पथकाच्या ताब्यात दिले. त्याला केज येथे नेण्यात आले असून खंडणीच्या गुन्ह्यासह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातील आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यासह तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही तो मुख्य संशयित आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर तो फरार झाला होता.

त्याचा शोध घेण्यासाठी ‘सीआयडी’ची पथके तैनात करण्यात आली होती. त्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांवर सर्वच स्तरातून दबाव होता. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. ‘सीआयडी’ने पुण्यातून त्याला ताब्यात घेतल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती, परंतु तपास यंत्रणांकडून त्याला दुजोरा देण्यात आला नव्हता.

स्कॉर्पिओमधून हजर

वाल्मीक कराड मंगळवारी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी ‘सीआयडी’च्या मुख्यालयात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून हजर झाला. या वेळी त्याच्या समवेत बीड, परळीतील चार-पाच समर्थक कार्यकर्ते होते. या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाल्मीक कराड ‘सीआयडी’ मुख्यालयात आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. त्यानंतर त्याला ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे केबिनमध्ये नेण्यात आले. त्याची सुमारे तीन तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला ‘सीआयडी’च्या पथकाने दुपारी मोटारीतून केजच्या दिशेने नेण्यात आले.

राजकीय द्वेषातून मला गोवले : कराड

‘‘माझ्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी ‘सीआयडी’च्या कार्यालयात हजर झालो. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी.

यात राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जात आहे. पोलिस तपासात मी दोषी ठरल्यास न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी भोगण्यास तयार आहे,’’ अशी प्रतिक्रिया वाल्मीक कराडने एका व्हिडिओद्वारे ‘सीआयडी’ मुख्यालयात हजर होण्यापूर्वी व्यक्त केली.

केज पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी वाल्मीक कराड ‘सीआयडी’च्या पुणे मुख्यालयात मंगळवारी दुपारी हजर झाला.

त्याची चौकशी केल्यानंतर त्याला पुणे आणि केजच्या दरम्यान ‘सीआयडी’चे बीड येथील पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला केज येथे नेण्यात आले असून, पुढील तपास ‘सीआयडी’चे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर करीत आहेत.

- सारंग आवाड, पोलिस उपमहानिरीक्षक, सीआयडी, पुणे मुख्यालय

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.