करिअरच्या वेगळ्या वाटा
esakal January 01, 2025 09:45 AM

डी. एस. कुलकर्णी

‘‘We will either find a way or make one!’’

लेह-लडाखमध्ये झोजिला पासच्या रस्त्यावर ‘इंडियन बॉर्डर ऑर्गनायझेशन’तर्फे एका माइलस्टोनवर मला हे वाक्य वाचायला मिळाले.

अशीच एक गोष्ट वाचली की आठवत नाही, आहे काल्पनिकच. एकदम भन्नाट आणि मनोरंजक आहे.

एका गावात एक सर्कस आली होती. फार काय प्रेक्षक येत नव्हते. नवीन काहीतरी प्रयोग करून दाखवला तर, प्रेक्षक येतील आणि व्यवसाय वाढेल या आशेने मॅनेजरने एक शो ठेवलाच. परंतु प्रेक्षक काही येईनात. मॅनेजर बिचारा हताश होऊन काळजीने गुडघ्यात मान घालून बसला होता. तेव्हढ्यात एक युवक हातात मोठी सुटकेस घेऊन मॅनेजरला भेटायला आला.

तो म्हणाला, ‘‘काहीही काळजी करू नका. एक एकदम नवीन भन्नाट, कल्पक, दिलखेचक प्रयोग घेऊन आलो आहे.’’

मॅनेजरला आश्चर्य वाटले आणि कुतूहलही वाढले.

‘‘कुठे आहे प्रयोग?’’, तो विचारता झाला.

‘‘या सुटकेसमध्ये आहे.’’ तो युवक म्हणाला. ‘‘माझ्याकडे पियानो वाजवणारा कुत्रा आहे. बघा तर एकदा. या सुटकेसमध्ये आहे.’’

‘‘बरं बाबा दाखव तरी’’

युवकाने सुटकेस उघडली. त्यातून एक गोंडस असे कुत्र्याचे पिल्लू बाहेर पडले आणि अगदी मस्तपैकी, त्या सुटकेसमधील पियानो वाजवायला सुरुवात केली. मस्त मेळ जमला. त्या सुरावटींवर मॅनेजर खूष झाला. आता प्रेक्षक जरूर येणार या आनंदात तो मश्गूल झाला. तेव्हढ्यात एक भला दांडगा कुत्रा मोठ्याने भूंकतच आत आला आणि त्या छोट्या कुत्र्याच्या बखोटीला धरून जोरात दरकटवत, ओढून घेऊन गेला. मॅनेजरला क्षणभर, काय झाले कळलेच नाही. त्याने विचारले ‘‘कोण होता तो कुत्रा?’’

‘‘तो कुत्रा नव्हता, त्या पिल्लाची आई होती. तिला त्या पिल्लाला डॉक्टर बनवायचे आहे.’’ युवक उद्गारला.

सारांश, पालक आपली राहिलेली इच्छा मुलांद्वारे पूर्ण करू पाहतात किंवा तत्कालीन प्रवाह बघून, त्याबरोबर वाहत जायचे ठरवतात. त्या बिचाऱ्या पिल्लाला काय बनायचे आहे, त्याकडे साफ दुर्लक्ष करतात. हे म्हणजे, माशाला झाडावर चढायला शिकवायचे, गरुडाला पोहायला शिकवायचे किंवा हरणाला शिकार करायला लावायची आणि वाघाला गवत खायला लावायचे, अशा प्रकारचे होऊन बसले आहे.

ते बिच्चारे बाळ सकाळी उठल्यापासून ते उशिरा रात्री झोपेपर्यंत अनेक छळ-छावण्यांमधून फिरत असते. आपण शाळेत का जातो? करिअर म्हणजे काय? ते कशासाठी करायचे? भविष्य अंधकारमय आणि स्पर्धेचे आहे म्हणजे नेमके कसे? हे त्याच्या बालबुद्धीला जरा देखील उमगत नसते. धाकाने ते शाळेत जात राहते आणि पुढे कॉलेजात.

माझ्या मतीला आणि अनुभवांना अनुसरून, नेमके काय करायले हवे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या सदराद्वारे करणार आहे. हा भवसागर तरून जाण्याचे काही मार्ग पण तपासून पाहणार आहोत. जगभरातील शिक्षण क्षेत्रात काय चालले आहे? याचा शोध घेऊया. आनंददायी शिक्षणाच्या आणि करिअरच्या शक्यता तपासून बघूया!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.