नवीन वर्षांपासून कार खरेदी करणे महागणार आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याची योजना आखत असाल तर कार कंपन्यांच्या वाढलेल्या किंमतीची माहिती जरूर घ्या. कार बाजारातील प्रसिद्ध टाटा, महिंद्र, मारुती, हुंडई, स्कोडा, फॉक्सवॅगन, एमजी आणि निसान या कार कंपन्यांचा देखील समावेश आहे. जानेवारीपासून किंमतीत वाढ झाली आहे. यात Mercedes Benz, BMW, Audi आणि Volvo या लक्झरी कारचा देखील समावेश आहे. चला तर पाहूयात कोण-कोणत्या कार कंपन्या किंमती वाढवीत आहेत.
महिंद्र – महिंद्र एण्ड महिंद्र कंपनीने एक जानेवारी २०२५ पासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत तीन टक्के वाढ केली आहे. आज किंवा त्यानंतर कधीही महिंद्र कंपनीच्या गाड्या खरेदी कराल तर गेल्यावर्षीच्या तुलनेत त्या महागच असणार आहेत.
मारुती सुझुकी – मारुती सुझुकी कंपनीच्या कार चार टक्के महागल्या आहेत. कंपनीने इतर कंपन्यांसारखे डिसेंबरमध्येच खुलासा केला होती कि कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.
मर्सिडिझ बेंझ – मर्सिडिझ बेंझ कंपनीने त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीने साल २०२४ मध्ये हे जाहीर केले होते.
ऑडी – ऑडी इंडियाने देखील त्यांच्या कारच्या किंमती तीन टक्के वाढ केली आहे.कंपनीचे बाजारात सोळा मॉडेल्स विक्रीसाठी ठेवले आहेत.
बीएमडब्ल्यू – बीएमडब्ल्यू कंपनीने गेल्यावर्षी २०२४ मध्ये जाहीर केले होते की नवीन वर्षांच्या सुरुवातीला कंपनी कारच्या किंमती वाढविणार आहे. कंपनीने नवीन वर्षात तीन टक्के किंमत वाढविली आहे.
हुंडई – हुंडई कंपनीने आपल्या सर्व कारच्या किंमतीत २५ हजारापर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. जर तुम्ही हुंडईचे कोणतेही मॉडेल खरेदी करीत असाल तर ते तुम्हाला वाढीव किंमतीतच खरेदी करावे लागणार आहे.
टाटा – टाटा मोटर्स आपल्या हॅचबॅक आणि एसयुव्ही सेगमेंटपर्यंत सर्वच मॉडल्सची विक्री करीत असते. टाटाने देखील नवीन वर्षांत सर्व मॉडेल्सची किंमत तीन टक्क्यांनी वाढविली आहे.
एमजी मोटर इंडियाने त्यांच्या कारच्या किंमतीत तीन टक्के वाढ केली आहे. Kia ने देखील आपल्या कारच्या मॉडेल्सच्या किंमती २ टक्क्यांनी वाढविल्या आहेत. स्कोडा देखील नवीन वर्षांत कारच्या किंमतीत तीन टक्के वाढ करीत आहे. जर तुमचा जीपची एसयुव्ही खरेदी करण्याचा विचार असेल तर ती तुम्हाला दोन टक्क्यांपर्यंत महाग मिळू शकते.