पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशीला स्थापन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ दिल्लीत ‘वीर सावरकर महाविद्यालय’ साकारले जाणार आहे. या महाविद्यालयाची कोनशीला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाचा हा प्रकल्प आहे. दिल्लीतील नदाफगंज येथील रोशनपुरा या भागात हे महाविद्यालय निर्माण होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अतुलनीय योगदान दिले आहे. देशात शस्त्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यक्रांती करण्याची सावरकरांची योजना होती. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचे अभियोग चालविण्यात येऊन त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा देण्यात आली होती. या दोन्ही जन्मठेपी त्यांना एकाचवेळी नव्हे, तर एकापाठोपाठ एक अशा भोगायच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल 27 वर्षे कारागृह आणि स्थानबद्धतेत काढली. स्वातंत्र्यसंग्रामासह त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजसुधारणा कार्यक्रमही हाती घेतले होते. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. तथापि, त्यांचा काँग्रेसला विरोध असल्याने स्वातंत्र्यानंतर त्यांच्या असीम त्यागाचा आणि परिश्रमांचा यथायोग्य सन्मान करण्यात आला नाही. त्यांच्या कार्याला कमी लेखण्यात आले होते. ही त्यांची अवहेलना सांप्रतच्या काळातही होत आहे. ही त्यांची सातत्याने चाललेली अवमानना काही प्रमाणात तरी दूर व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दिल्लीत होणार ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी दिल्लीत अनेक विकास योजनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यांनी ऑन लाईन पद्धतीने या विकास योजनांची उद्घाटने केली. या प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक वर्ल्ड ट्रेड सेंटरचा समावेश आहे. हा प्रकल्प नौरोजी नगर येथे साकारला जाणार आहे. मनोऱ्यांच्या स्वरुपातील या प्रकल्पामुळे दिल्लीचे आणि देशाचे उद्योग तसेच व्यापार क्षेत्र विकसीत होणार आहे.
झोपडपट्टीवासियांना घरे
दिल्लीतील अशोक नगर येथील झोपडपट्टीवासियांना पक्क्या बांधणीच्या सदनिका दिल्या जाणार आहेत. अशा 1 हजार 675 सदनिकांचे निर्माण कार्य केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑन लाईन उद्घाटन करण्यात आले.
एकंदर 17 हजार कोटींच्या योजना
दिल्लीकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एकंदर 4 हजार 500 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली. दिल्लीतील नागरी वाहतूक व्यवस्था अत्याधुनिक आणि कार्यक्षम करण्याच्या प्रकल्पाचीही पायाभरणी त्यांनी केली. हा प्रकल्प नितीन गडकरी यांच्या मार्गपरिवहन विभागाकडून साकारला जाणार असून त्यासाठी 12 हजार 500 कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकंदर दिल्लीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा शीलान्यास शुक्रवारी केला आहे. दिल्लीच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत असून या सुविधांचा विस्तार केला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार कधीही धनाची कमतरता होऊ देणार नाही. नागरीकांना अशा सुविधा देणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आम आदमी पक्षावर टीका
प्रकल्पांचा शीलान्यास केल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत गेली 10 वर्षे सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार म्हणजे दिल्लीवर ओढविलेले एक महान संकट आहे. दिल्लीचा विकास या सरकारमुळे खुंटला आहे. दिल्लीतील जनता हे सरकार पाडण्यास उत्सुक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे ही संधी लवकरच दिल्लीच्या जनतेला मिळेल. दिल्लीतील मतदार या संधीचा पुरेपूर लाभ उठविल्याशिवाय राहणार नाहीत. ते विकासविरोधी असणाऱ्या आणि खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या सध्याच्या राज्य सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.
सावरकर महाविद्यालयावरुन वाद
दिल्लीत सावरकर महाविद्यालय स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या महाविद्यालयाला मनमोहनसिंग यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांनी केली. मात्र, काँग्रेसला सावरकरांचा द्वेष वाटत असल्याने केंद्र सरकारच्या योजनेला हा पक्ष विरोध करीत आहे, असा प्रत्यारोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
रेवडी विरुद्ध विकास
यंदा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या ‘रेवड्या’ चालतात की भारतीय जनता पक्षाचा विकास चालतो यासंबंधी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आम आदमी पक्षाने अनेक विनामूल्य सुविधांची घोषणा केली आहे. तर भारतीय जनता पक्षाने विकासाचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे.
अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत अनेक योजनांचे उद्घाटन
ड वीर सावरकर महाविद्यालय प्रकल्प अनेक वेशिष्ट्यांसह यात अग्रभागी
ड दिल्लीपील काही भागांमधील झोपडपट्टीधारकांना मिळणार पक्की घरे
ड दिल्लीच्या नागरी वाहतूक व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्धार