बुमराह कर्णधार नको म्हणून कोणी टाकला मिठाचा खडा? टीम इंडियात जसप्रीतचा शत्रू कोण?
GH News January 01, 2025 06:08 PM

रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे पर्थ कसोटीत भारताचं नेतृत्व यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलं होतं. या सामन्यात टीम इंडियाला यशही मिळालं. त्यानंतर उर्वरित सामन्यात टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. पण पहिल्या सामन्यातही कर्णधारपदावरून वाद झाल्याचं माहिती समोर येत आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत एका दिग्गज खेळाडूने अंतरिम कर्णधार म्हणून दावा ठोकला होता. मीडिया रिपोर्टमध्ये सदर खेळाडूचं नाव काही समोर आलेलं नाही. पण हा वरिष्ठ खेळाडू असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी काहीच शहनिशा न करता विराट कोहली असू शकतो असा दावा केला आहे. पण याबाबत ठोस अशी कोणतीच माहिती नाही. विराट कोहलीने 2022 मध्ये कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर जर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीत स्थान मिळवलं नाही, तर रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होईल. या जागेसाठी जसप्रीत बुमराहला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्मा सध्या करिअरच्या वाईट काळातून संक्रमण करत आहे. त्यामुळे सिडनी कसोटी ही त्याच्या कसोटी कारकि‍र्दीचा शेवट असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढे टीम इंडियाची धुरा जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवली जाऊ शकते. कारण उपकर्णधारपदाची धुरा सध्या त्याच्याच खांद्यावर आहे. पहिला कसोटी सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. तरीही कर्णधारपदावर एका वरिष्ठ खेळाडूचा डोळा असल्याचं दावा केला जात आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीची ही शेवटची आशा आहे. पण सिडनी मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड काही खास नाही. या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना 1978 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत विजयासाठी टीम इंडियाची धडपड सुरु आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी सामना जिंकला की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट मिळेल. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.