टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील आतली बातमी आली बाहेर, गौतम गंभीरने एकेकाला झापला; तसंच…
GH News January 01, 2025 06:08 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत चांगली सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाची इतर तीन सामन्यात पिछेहाट झालीआहे. आता मालिका 2-2 बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. कारण मेलबर्न कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. खर तर मेलबर्न कसोटी सामना ड्रॉ करण्याची संधी टीम इंडियाच्या हाती होती. मात्र शेवटच्या सत्रात होत्याचं नव्हतं झालं आणि सामना गमवावा लागला. असं असताना या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये तणावाचं वातावरण असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रेसिंग रुमच्या आतली गोष्ट बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियात बरंच काही घडलं आहे. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये बराच राडा झाला. गौतम गंभीर टीम इंडियाच्या फलंदाजीवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. पराभवानंतर गौतम गंभीरने रोहित शर्मा-विराट कोहलीसह सर्वांनाच झापलं. इतकंच काय तर गंभीरने स्पष्ट केलं की आता बस झालं. तुम्ही जागे होता की नाही, मी इतके दिवस काहीच बोललो नाही. याचा अर्थ मला गृहीत धरा असा होत नाही.

प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केलं की, पुढे जर कोणी रणनीतीचं योग्यरित्या पालन केलं नाही तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. गौतम गंभीरच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. कारण 9 जुलैला पदभार स्वीकारल्यानंतर गौतम गंभीरने खेळाडूंना मोकळीक दिली होती. मात्र खराब प्रदर्शन पाहता आता त्याने मुसक्या आवळल्या आहेत. खराब प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा एक रिव्ह्यू घेतला आहे. इतकंच काय तर टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबतही मोठा खुलासा समोर आला आहे. गौतम गंभीरने संघात चेतेश्वर पुजाराला घ्यावं अशी विनंती केली होती. पण निवडकर्त्यांनी त्याच्या मागणीकडे कानाडोळा केला. चेतेश्वर पुजाराचे ऑस्ट्रेलियातील आकडे चांगले आहेत आणि मैदानात तग धरून खेळण्याची क्षमता होती. हीच उणीव सध्याच्या संघात दिसून आली आहे.

पर्थ कसोटीत कौटुंबिक कारणास्तव रोहित शर्मा संघात नव्हता. त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे सूत्र सोपवली होती. मिडिया रिपोर्टनुसार, एक खेळाडू त्याला कर्णधार करण्याच्या विरोधात होता. तसेच अंतरिम कर्णधार म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट केलं होतं. पण या खेळाडूचं नाव काही समोर आलं नाही. पण यामुळे संघात बराच वादंग असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, ड्रेसिंग रुममधील बातम्या लीक झाल्याने माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने नाराजी व्यक्त केली आहे. ‘जे काही ड्रेसिंग रुममध्ये होतं ते बाहेर येता कामा नये.’, असा सल्ला इरफान पठाणने दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.