संदेश वाहाणे
या वर्षीचा पहिला सिनेमा ज्यासाठी सगळे उत्सुक होते. त्याला कारणही तसंच होतं. परेश मोकाशी ज्यांचा आतापर्यंत एकही प्रोजेक्ट फेल ठरला नाही. त्यांना आपण अभ्यासू दिग्दर्शक म्हणून ओळखतो, जे खूप परफेक्शनने काम करतात. पण आज मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी बघितल्यानंतर मी खूप निराश झालो. नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल असा मी विचार करून गेलो होतो पण तस झालं नाही.
प्रशांत दामले हे हिटलरच पात्र साकारणार हे समजल्यावर एक गोष्ट फिट बसली होती की ते या भूमिकेला न्याय देतील. वास्तविकतेसोबत यातील कथा आणि पात्र मेळ खात नाही हे तर सर्वाना माहीत आहे. यातील सर्वच पात्र खूप विचित्र आहेत. त्यात प्रशांत दामले यांनी उत्तम अभिनय केलाय. त्यांचा कॉमिक टायमिंग अचूक आहे त्यात काही वाद नाही पण आणखी चांगला होऊ शकला असता. बऱ्याचदा आपल्याला त्या पात्राच्या अभिनयामध्ये आणि हावभावांमध्ये तोचतोचपणा वाटतो. सुरुवातीच्या सिनमधलं त्यांचं प्रेयसीसोबतच संभाषण आणि तिथला तो पूर्ण सीन खूप छान होता. पण ती लेव्हल ते टिकवून ठेवत नाहीत कारण मेकर्सने एंट्रीवर जास्त काम केलंय बाकीच्या गोष्टींवर नाही.
आनंद इंगळे यांचा स्क्रिनटाईम सर्वात कमी आहे आणि त्यांचं चर्चिल हे पात्र स्टोरीमध्ये कुठलीही भर टाकत नाही त्यामुळे ते कॅरेक्टर आपल्याला तेवढस खास वाटत नाही. त्यात आनंद इंगळे यांचा अभिनय कामचलाऊ दर्जाचा आहे. वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, मनमीत, प्रणव आणि रितिका यांची पात्र बोंबीलवाडीमधील स्थानिक रहिवाशी असतात. यातील सर्वांचाच काम अप्रतिम आहे. सिनेमाच्या सुरवातीला नाटकाच्या तालीममधून सर्वांची ओळख होते. तो पूर्ण सीन कॉमेडीने भरलाय.
डायरेक्शन आणि रायटिंग बद्दल बोलायचं झालं तर परेश मोकाशी यांनी अक्षरशः निराश केलंय. कुठल्याच दृष्टीने हा त्यांचा चित्रपट वाटत नाही. २००१ मध्ये केलेल नाटक ते लोकांना खूप आवडलं हिट ठरलं पण आता २०२५ मध्ये लोकांची मानसिकता खूप बदललीय. जर या प्रोजेक्टला हिट करायचंय तर तेव्हाचा आत्मा तसाच ठेवून आताच्या जनरेशनच्या विचारांनुसार त्यात अजून बऱ्याच गोष्टी टाकायला हव्या होत्या. त्यांच्या आतापर्यंतच्या लिखाणाच्या तुलनेत हा सर्वात ठीक ठाक आहे
स्क्रीनप्ले तर बऱ्याच ठिकाणी स्ट्रेच करतोय असं वाटतं. उदाहरणार्थ अद्वैतचे सीन खूप खेचल्यासारखे वाटतं. इंटरव्हल पर्यंत सिनेमा १०० मिनिटांचा आहे पण तरीसुद्धा तो रटाळ वाटतो. सिनेमा आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तो संपेपर्यंत समजत नाही. हिटलरचं विमान बोंबीलवाडीत क्रॅश कसं झालं, तो कसा जिवंत राहिला, माणूस बाइकवरून खाली पडला तर त्याला जागोजागी जखमा होतात त्याच तर विमान पडलंय आणि त्याला फक्त एक टेंगुळ आलं? चर्चिल पॅराशूटने ने येतोय असं दाखवलं पण लँड करताना दाखवलं नाही. या सर्व गोष्टीला क्लायमॅक्स कव्हर करेल असं वाटलं होत पण तो सुद्धा केविलवाणाच निघाला
चांगल्या गोष्टी सांगायच्या तर डायलॉग्स खूप चांगले लिहिले गेलेत. सिनेमॅटोग्राफी पण चांगली आहे. बॅकग्राउंड म्युजिकचाही खूप चांगला वापर केला गेलाय. सेकंड हाफमध्ये हिटलर बोंबीलवाडीत येतो तेव्हा कथा थोडीशी वेग पकडते पण ती पूर्णतः समाधान करत नाही. तसं यात गाणी नाही, १०० मिनिटांचा चित्रपट, त्यात एकापेक्षा एक प्रतिभावंत कलाकार यांचा वापर मेकर्सला करून घेता आला असता पण त्याच्या विरुद्ध झालं. आताच्या प्रेक्षकांना आवडेल असं नाविन्यपूर्ण यात काहीच नाही. एकूण काय तर दिशाहीन कथानक याचा मारक ठरला. कुठल्याही अपेक्षा न ठेवता कलाकारांचं काम बघायचं असेल तर तुम्ही एकदा हा चित्रपट पाहू शकता.