मुंबई : राज्यासह देशात आणि जगभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. इंग्रजी नवीन वर्षाच्या अनेक राजकारण्यांकडून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राज ठाकरेंनी भलीमोठी पोस्ट करत, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतानाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी माणसांविषयी आणि त्यांच्यासोबत घडत असलेल्या घटनांविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. मराठी माणसांचा वापर हा केवळ मतांसाठीच केला जात असल्याचे उद्विग्नता त्यांनी आपल्या पोस्टमधून मांडली आहे. (Raj Thackeray expressed his regret for Marathi people while wishing happy new year)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नववर्षाच्या शुभेच्छा देत म्हटले की, “सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे, कारण या शतकातील, पाव शतक संपायला आले. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की 25 वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळे युग वाटावे. या 25 वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेले.” असे ठाकरेंनी लिहिले आहे.
– Advertisement –
हेही वाचा… New Year 2025 : 2024 वर्ष गाजवले ते हिंदुस्थानातील निवडणुकांनी, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
“या 25 वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणे. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणे. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणे. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचे आयुष्य महागाईने होरपळून निघणे आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमके मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे.” असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या मनातील उद्विग्नता व्यक्त केली.
– Advertisement –
तर, पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवे, असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. “23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळले. नक्की काय घडले यावर माझे मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझे आवाहन आहे की जे घडले ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जात आहे हे वास्तव अधोरेखित झाले. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत,” अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.