Malanggad Funicular Train: २ तासांचा प्रवास १० मिनिटांत, मलंडगडला फटाफट पोहचाल, 'या' दिवशी सुरु होणार फ्युनिक्युलर ट्रेन
Saam TV January 04, 2025 05:45 AM

Malanggad Funicular Train: ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे ठिकाण पर्यटनासह धार्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या टेकडीवर जाण्यासाठी तब्बल २,६०० पायऱ्या चढाव्या लागतात. यात दोन तास वेळ जातो. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मलंगगड टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही वर्षांपासून या ट्रेनचे बांधकाम सुरु होते. नवनवर्षात ही प्रवासाकरिता खुली करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मलंगगड टेकडीला मुंबईसह , नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देत असतात. प्रवासादरम्यान त्यांना असंख्य पायऱ्या चढाव्या लागतात. या टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रेन सुरु झाल्याने नागरिकांना फायदा होणार आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना दिलासा मिळणार आहे. मलंगगडाचा प्रवास करताना २ तास लागतात. या ट्रेनमुळे हा प्रवास फक्त १० मिनिटांमध्ये करता येणार आहे.

ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने या प्रकल्पाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगड ट्रेन मार्गिकेवर २ ट्रेन धावणार असून का ट्रेनला दोन प्रशस्त डब्बे असणार आहेत. यात १२० प्रवासी एका वेळेस प्रवास करु शकणार आहेत. त्यांनी मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. 'ट्रेनची चाचणीदेखील झाली आहे. या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (२५ किंवा २६ जानेवारी रोजी) प्रकल्पाचे उद्धाटन केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूण ७० कर्मचारी या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी तैनात करण्यात आले आहेत. ट्रेनच्या मार्गिकेसाठी मलंगगड टेकडीवरील १.२ किमीचा भाग तोडण्यात आला होता. या प्रकल्पाचा २०१३ मध्ये शुभारंभ झाला होता. ऑक्टोबर २०१३ मध्ये ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने एका खासगी कंत्राटदाराकडे प्रकल्पाचे काम दिले होते. मार्च २०१५ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा होती.त्यासाठी ९३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला गेला. या ट्रेनमुळे मलंगगड परिसरात पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास स्थानिकांना आणि अधिकाऱ्यांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.