छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि बाळासाहेब ओसवाल यांनी नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. असे करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो टाकत एक भलीमोठी पोस्ट लिहिली होती. त्यांनी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. (Former Mayor of Chhatrapati Sambhajinagar Nandkumar Ghodele will join Shiv Sena)
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता पुढील काही महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आतापासून जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होते. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून आतापासूनच योजना आखताना दिसत आहेत. मात्र आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
– Advertisement –
हेही वाचा – Politics : धनंजय मुंडेंनी विना खात्याचे मंत्री राहावे; करूणा मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस यांचे गंभीर आरोप
दरम्यान, शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर नंदकुमार घोडेले म्हणाले की, मी जवळपास 30 वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात मागच्या काळात ज्या प्रकारे काम झालं आहे, त्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. कारण हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यामुळे पक्षाला याचा फटका बसला असल्याचे मला वाटतं. त्यामुळे भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेबरोबर असणं गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणत्याही नेत्यासोबत माझी नाराजी नाही. पण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास नंदकुमार घोडेले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना व्यक्त केला.
– Advertisement –
हेही वाचा – Politics : शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, त्यांच्या वांग्याला…; असं का म्हणाले विखे पाटील?