मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचं नाव येत आहे. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. दोघांचे काही फोटो देखील समोर आले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात वाल्मिक कराडवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याची चर्चा होते. त्यामुळे वाल्मिक कराडची ताकद इतकी वाढल्याच बोललं जातं. हा वाल्मिक कराड आता तुरुंगात बंद आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यानंतर या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे.
आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आली आहे. महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. धनंजय मुंडे यांना NCP चे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री बनवलं आहे. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं आहे’
बीडच्या घटनेनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी केली आहे. “मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांना हवं असतं, तर ते अनेक वाल्मिक कराड निर्माण करू शकले असते. पण गोपीनाथ मुंडे असे नेते नव्हते” असं गजानन किर्तीकर म्हणाले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी शिवसेना नेते माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी मागणी केलीय. बीड घटनेनंतर गजानन किर्तीकर यांनी अनेक खुलासे केले आहेत.
डॉ संभाजी वायबसेचा रोल काय?
या प्रकरणात आरोपींना पळून जायला मदत करणाऱ्या डॉ संभाजी वायबसे याला अटक झाली. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना बसवराज तेली यांच्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आलं आहे.