Beed santosh deshmukh murder case three accused remanded in 14 day cid custody
Marathi January 05, 2025 08:24 AM


बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तिघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. यात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोघांना पुण्यातून तर सोनवणे याला कल्याण येथून अटक करण्यात आली. या तिघांना शनिवारीच केज न्यायालयात हजर करण्यात आले. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.व्ही. पावसकर यांनी त्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. या तीनही आरोपींना 26 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. (beed santosh deshmukh murder case three accused remanded in 14 day cid custody)

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले यांना अटक केली. मात्र, 26 दिवस झाले तरी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तिघेजण फरार होते. या तिघांना पोलिसांनी ‘वॉन्टेड’ घोषित करत पकडून देणाऱ्यास बक्षीसाची घोषणाही केली होती. त्यानंतर लगेचच त्यातील दोघांना अटक झाली आहे.

– Advertisement –

सरपंच देशमुख यांची हत्या करून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे आरोपी फरार झाले. आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हादेखील फरार होता. या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींना शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी वकिलांनी बाजू मांडताना सांगितलं की, आरोपींकडून दहशत माजवून खंडणी मागितली जात असल्याने येथे नवनवीन उद्योग येत नाहीत. आरोपींकडून संघटित गुन्हेगारी सुरू आहे. 9 तारखेपासून हे आरोपी फरार होते, ते कुठे होते, त्यांना कुणी मदत केली, याची चौकशी होणं गरजेचं होतं. हे लोक सिंडिकेट चालवतात, ते एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे यांच्यावर मकोकांतर्गत कारवाई अपेक्षित असल्याचे, सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. सरकारी वकिलांची विनंती मान्य करत न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

– Advertisement –

आरोपीच्या वकिलांनी कस्टडीला विरोध करत म्हटलं की, घटनास्थळी किंवा आरोपींकडे शस्त्र सापडलेलं नाही. पोलिसांनी विष्णू चाटेची कस्टडी घेतली पण त्यांची चौकशी केली का? काय माहिती पुढे आली, याबाबत स्पष्टता नाही. असे त्यांनी सांगितले. मात्र कोर्टाने त्यांची मागणी फेटाळत चौकशीसाठी आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आरोपींना पुण्यातून अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांसह ‘सीआयडी’ला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मग, पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसेला प्रथम नांदेडमधून ताब्यात घेतले. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घुले आणि सांगळेला अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली. त्यानंतर घुले आणि सांगळेला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

दरम्यान, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.