सोन्याची पावती पाहून थक्क व्हाल!
Marathi January 05, 2025 01:25 PM

वाढत्या महागाईची आता आपल्याला सवय झाली आहे. तथापि, आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती नेहमी नव्या पिढ्यांना त्यांच्या काळातल्या स्वस्ताईच्या गोष्टी सांगत असतात. त्यावेळी रुपयाची किंमत मोठी होती आणि वस्तू स्वस्त होत्या. महिना 25 रुपये वेतनावर सर्व कुटुंब आपण कसे चालवत होते, याच्या कथाही आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. गहू, तांदूळ, दूध, तूप, डाळी, भाजीपाला तर सोडाच, पण सोन्याचे दरही आज आश्चर्य वाटेल इतके कमी होते.

सध्या सोशल मिडियावर 1959 मधील एक सोन्याची पावती भलतीच लोकप्रिय होत आहे. ही पावती एका सुवर्णआभूषणांच्या पेढीची आहे. ती पाहता असे कळते की त्यावेळी एक तोळा (म्हणजे 10 ग्रॅम सोने) सोन्याची किंमत 113 रुपये होती. महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर यांची ही पेढी होती असे दिसून येते. तर ग्राहकाचे नाव शिवलिंग आत्माराम असे असल्याचे ही पावती म्हणते. या आत्माराम यांनी एकंदर सोन्याचांदीच्या आभूषणांची 909 रुपयांची खरेदी केली होती. या सर्व खरेदीचा हिशेब लक्षात घेतला तर सोन्याची किंमत त्याकाळी 113 रुपये प्रतितोळा असल्याचे दिसून येते. आज एक मोठे चॉकलेटही या पेक्षा अधिक किमतीला उपलब्ध आहे. आज सोन्याचा भाव एका तोळ्याला 80 हजाराची मर्यादा ओलांडून गेला आहे. याचाच अर्थ असा की, सोन्याच्या दृष्टीने पहायचे, तर त्यावेळच्या 113 रुपयांची किंमत आज 80 हजार रुपये आहे. त्यावेळी 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10 पैसे अशी नाणी असत. त्यावेळी या नाण्यांचीही किंमत होती. आज 50 पैशांचे नाणेही चलनातून गेल्यात जमा आहे. इतकेच नव्हे, तर यापुढच्या काळात सर्वात कमी किमतीचे चलन कदाचित 10 रुपये हे असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.