Australia vs India Sydney Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील रविवारी तिसरा दिवस आहे. या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान, या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली प्रभारी कर्णधाराची भूमिका निभावत आहे. याचवेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवरही मीठ चोळले आहे.
झाले असे की ऑस्ट्रेलिया १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले होते. यावेळी १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने उस्मान ख्वाजासोबत सलामीला फलंदाजी करताना आक्रमक खेळ केला. मात्र चौथ्या षटकात कॉन्स्टासला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्याने १७ चेंडूतच २२ धावा केल्या.
पाठोपाठ ८ व्या षटकात मार्नस लॅबुशेन ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने ख्वाजाला साथ देण्याचा प्रयत्न केला. स्मिथला १० हजार कसोटी धावा पूर्ण करण्यासाठीही ५ धावांची गरज होती. मात्र त्याला ४ धावांवरच प्रसिद्ध कृष्णानेच यशस्वी जैस्वालच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ५८ धावा अशी झाली होती.
याच दरम्यान स्मिथ बाद झाल्यानंतर ११ व्या षटकादरम्यान विराट स्टेडियममधील प्रेक्षकांसोबत जुगलबंदी करताना दिसला. त्याने प्रेक्षकांना प्रसिद्ध सँडपेपर घटनेची आठवण करून दिली. ही घटना ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील एक वाईट घटना आहे.
त्याने खिसे रिकामे करूनही दाखवले की त्याच्या खिशात सँडपेपर नाही. तसेच आम्ही अशा गोष्टी करत नसल्याचे त्याने हावभाव करत सांगितले. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.
मार्च २०१८ मध्ये केपटाऊनला ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सँडपेपरचा वापर करून चेंडू छेडछाड करण्याच्या प्रकरणात अडकला होता. त्यावेळी बॅनक्रॉफ्टकडे सँडपेपर सापडला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ होता, तर उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर होता. चेंडू छेडछाडीची कल्पना वॉर्नरची असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक कारवाई केली होती. त्या प्रकरणात बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची, तर स्मिथ व वॉर्नरवर प्रत्येकी एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. नंतर बंदीचा काळ पूर्ण करत त्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पण ही घटना नेहमीच एक वाईट आठवण म्हणून समजली जाते.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्यात काही युझर्सने असा आरोप केला होता की भारताने चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: जसप्रीत बुमराहने.
हे व्हिडिओ व्हायरल झाले असतानाच तिसऱ्या दिवशी विराटने आम्ही चेंडू छेडछाड करत नाही, असं सांगत चर्चेला जवळपास पूर्णविराम लावला.
या सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने १३ षटकात ३ बाद ७१ धावा केल्या आहेत. त्यांना अद्याप विजयासाठी ९१ धावांची गरज आहे.