Kokan Latest News: कोकण रेल्वे मार्गावरील आडवली ते विलवडे या स्थानकादरम्यान दुपारी साडेबारा वाजता ओव्हरहेड वायर तुटली. दुपारी दोन वाजता तुटलेली वायर जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले. या दरम्यान रत्नागिरी ते वैभववाडी स्थानकात सर्व गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. दुपारी दोननंतर वाहतूक सुरू झाली, मात्र सर्वच गाड्या चार ते साडेचार तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, सिंधुदुर्गात येणारी मांडवी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी, मंगला एक्स्प्रेस या गाड्या रात्री आठनंतर कणकवली व इतर स्थानकांत दाखल होणार असल्याने प्रवाशांना आपले गाव गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार आणि अधिक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला.
रेल्वे मार्गावरील आडवली (ता. लांजा) या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुपारी साडेबाराच्या सुमारास तुटली.
त्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने कामगार आणि यंत्रणा आणून वायर दुरुस्तीचे काम सुरू केले. यात मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी तर जनशताब्दी आडवली येथे थांबवली. याखेरीज दिवा-सावंतवाडी ही उक्षी स्थानकात,
सावंतवाडी-दिवा भोके स्थानकात, केरळ ‘संपर्कक्रांती’ रत्नागिरीत, दिल्लीकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस विलवडेत, डाऊन मंगला सावर्डे स्थानकात, मरुसागर आणि तेजस एक्स्प्रेस निवसर स्थानकात थांबविण्यात आल्या.
---
...अन् वेगवान गाड्या आधी मार्गस्थ
दुपारी दोन वाजता ओव्हरहेड वायर जोडणीचे काम पूर्ण केले; मात्र रत्नागिरी ते वैभववाडी स्थानकात थांबवून ठेवण्यात आलेल्या सर्व गाड्या मार्ग करताना सर्वाधिक वेगवान गाड्या आधी मार्गस्थ करण्यात आल्या.
यात राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, केरळ संपर्कक्रांती या गाड्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे इतर सर्व गाड्या चार ते साडेचार तास विविध स्थानकांवर थांबून राहिल्या होत्या. त्याचा मोठा फटका जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांना बसला.
रात्री आठनंतर या गाड्या जिल्ह्यातील स्थानकांत दाखल होणार असल्याने प्रवाशांना आपापल्या गावी जाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.