पोरबंदर : येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या पोरबंदर शहराबाहेरील विमानतळावर ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. साधारणपणे दुपारी १२.२० च्या सुमारास हा अपघात झाला.
तटरक्षक दलाचे हे वजनाला हलके हेलिकॉफ्टर दैनंदिन फेरी मारून या विमानतळाच्या दिशेने परतले होते. तळावर उतरत असतानाच ते रनवेवर अपघातग्रस्त झाले असे पोलिस अधिक्षक भगीरथसिंह जडेजा यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. संबंधित हेलिकॉप्टर धावपट्टीवर कोसळल्यानंतर त्याला अचानक आग लागली.
या अपघाताचे वृत्त समजताच अग्निशामन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीमध्ये तीनही कर्मचारी गंभीररीत्या भाजल्या गेले होते. यातील दोघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या कर्मचाऱ्यांची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरला चारच महिन्यांपूर्वी अरबी समुद्रामध्ये अशाच पद्धतीने अपघात झाला होता त्यातही तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.