नवी दिल्ली : ‘‘दिल्लीचा सर्वांगीण विकास भाजपच करू शकते. त्यामुळे येथील नागरिकांनी दिल्लीला आम आदमी पक्षापासून म्हणजे ‘आप’त्ती पासून मुक्त करावे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रोहिणी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले...‘‘दिल्लीच्या तसेच आगामी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करा. मागील दहा वर्षांच्या काळात दिल्लीकरांनी जे सरकार पाहिले आहे, ते ''आपत्ती'' पेक्षा काही कमी नाही. ''आपत्ती सहन करणार नाही, ती बदलून टाकणार, असा आवाज सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. देशवासीयांनी सलग तीनवेळा भाजपवर विश्वास टाकत केंद्रात या पक्षाला निवडून दिले.
यावेळी दिल्लीच्या लोकांनी भाजपवर विश्वास टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावाही मोदी यांनी यावेळी केला. ‘‘गरीब आणि मध्यमवर्गीयांची स्वप्ने साकार करणारे शहर म्हणून दिल्लीकडे पाहिले जाते. दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनविण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी केंद्र आणि दिल्ली दोन्हीकडे भाजपचे सरकार सत्तेत असायला हवे, असेही मोदी म्हणाले.
‘आप’कडे धोरण नाहीआम आदमी पक्षाच्या सरकारचा उल्लेख आपत्ती सरकार असे करत मोदी म्हणाले, आपत्तीकडे कोणतेही ध्येयधोरण नाही, हे सरकार लोकांचा विकास करू शकत नाही. ‘‘दिल्लीला आधुनिक बनविण्यासाठी जी काही कामे सुरू आहेत, ती केंद्र सरकारकडून राबवली जात आहेत. ‘राष्ट्र प्रथम’ हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भाजप काम करीत आहे. दुसरीकडे ‘आपत्ती’वाल्यांनी दिल्लीतील प्रशासनाचा खेळखंडोबा करून टाकला आहे,’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
पार्किंगसाठी येथे रोज हाणामाऱ्या होत आहेत; शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रिक्षाचालक जाण्यास तयार नाहीत असेही मोदी म्हणाले. ‘‘केंद्र सरकार काम करू देत नाही, असा आरोप ‘आपत्ती’वाले करतात, मात्र हे साफ खोटे आहे. याचे उदाहरण शीशमहल आहे. दिल्लीकर जेव्हा कोरोनाशी झुंज देत होते, तेव्हा तिकडे शीशमहलवर कोट्यवधी खर्च होत होता,’’ असा आरोप त्यांनी केला.
‘जनहिताची कामे बंद करणार नाही’‘भाजप सत्तेत आली तर ही योजना बंद होईल, ती योजना बंद होईल, असा प्रचार केला जात आहे. मात्र तसे काही होणार नाही. वास्तविक जनहिताची कोणती योजना बंद होणार नाहीच, पण अशा योजनांतील बेईमांनाचा जो काही ठेका आहे, तो बाहेर काढला जाईल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत स्पष्ट केले.