Akola : भाजप आमदार हरीश पिंपळेंचा रौद्रावतार; विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना डांबलं विश्रामगृहात
Marathi January 06, 2025 08:24 PM

Akola News अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्रावतार बघायला मिळाला आहे. आमदार पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चक्क मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं असल्याचे पुढे आले आहे. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मधील 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा (Pradhan Mantri Krishi Bima Yojana) लाभ मिळाला नाही. त्याच्याच रागातून आमदार पिंपळे (Harish Pimple) यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाच्या खोलीत डांबलंय.

परिणामी, शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढणार नसल्याचा आमदार पिंपळे यांचा निर्धार केला आहे. या प्रकरणानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर घटनास्थळावर पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले असता हे प्रकरण काहीसे शांत झाले आहे.

बारदाने नसल्याने 8 दिवसांपासून शेतकरी ताटकळत

दुसरीकडे, नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाने (पोते) नसल्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढत सोयाबिनची रखवाली करावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील हे चित्र आहे. हदगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. विक्रीची तारीख कळल्यानंतर शेतकऱ्यांनी इथे सोयाबीन विक्रीसाठी आणले. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्यानंतर मात्र बारदाने अर्थात पोते संपल्याचे कारण दाखवून खरेदी बंद करण्यात आली.

दरम्यान, शेतकर्‍यांनी ओरड केल्यानंतर त्यांना स्वत: बारदाने आणा नाफेडकडून बारदाने आल्यास तुम्हाला बारदाने परत करू, असे सांगण्यात आले. पण एका बारदाण्याची किंमत ही 46 रुपये इतकी आहे. त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसतोय. बारदाने संपल्याने अनेक शेतकरी आठ ते दहा दिवसापासून रांगेत ताटकळत आहेत. एक दिवसाचा थांबण्याचा किराया ट्रॅक्टर मालक दीड ते हजार रुपये आकारत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड बसत आहे. रात्री सोयाबीन चोरीला जाऊ नये म्हणून त्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री आपल्या ट्रॅक्टर जवळ झोपावे लागत आहे.

पीएम किसानचे पैसे कधी येणार?

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. 19 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.  केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना काही चूक झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही. दुसरे म्हणजे, बँक खात्याचा तपशील बरोबर असावा. तिसरे, तुमचा मोबाईल बँक खात्याशी जोडलेला असावा. यामध्ये काही त्रुटी राहिल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.