बेशिस्त चालकांना पोलिसांचा दणका
esakal January 06, 2025 10:45 PM

विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) : शहर, तसेच आजूबाजूच्या गाव-पाड्यांसह गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये पोलिसांनी विशेष गस्त मोहीम राबवून चालकांवर धडक कारवाई केली आहे. मद्यप्राशन करून गाडी चालविणे, अन्य बेकायदा कृत्ये याप्रकरणी चालकांना दणका देत वर्षभरात तब्बल दोन हजार ३३२ केस दाखल केल्या असून, १५ लाख ६३ हजार ९०० रुपयांची दंडवसुली केल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षभरापासून विक्रमगड पोलिसांनी विनाचालक परवाना, कागदपत्रे न बाळगता वाहन चालविणे, मोटरसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करणे, बेकायदा जागेवर आणि रस्त्यामध्येच गाडी उभी करणे, मद्यप्राशन करून गाडी चालविणे, अशा विविध बेकायदा कृत्यांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. पोलिस महासंचालक यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पारखे यांनी मुख्य नाक्यावर, तसेच आजूबाजूच्या गाव-पाड्यांत गस्त वाढवून दोन हजार ३३२ केस दाखल केल्या आहेत. त्यामुळे मनमानीप्रमाणे वाहन चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेमध्ये विक्रमगड पोलिस कार्यालयातील वाहतूक शाखा हवालदार अंकुश कुवरा, नितीन हरवटे आणि भालचंद्र भोये, अन्य कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाटीलपाडा, मुख्य बाजारपेठ, शंकर मंदिर अशा मुख्य रस्त्यावर गस्त ठेवून चालकांवर धडक कारवाईची मोहीम उभारली होती.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा वाहन चालविणाऱ्यांमध्ये दरारा निर्माण झाला आहे. आतापर्यंत प्रथम अशा प्रकारची धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली आहे असून, अपघातांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत सुसाट वाहन चालवणारी तरुण पिढी स्वतःसह अन्य प्रवाशांचा जीव टांगलीला लावत असते. त्यामुळे कायद्याचा बडगा हवाच, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मार्चमध्ये सर्वाधिक कारवाई
पोलिसांनी तालुक्यात मार्चमध्ये विविध ठिकाणी कारवाई करत सर्वाधिक २७१ केस दाखल केल्या आहेत. वर्षभरातील सर्वांत कमी कारवाया मेमध्ये झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. या महिन्यात ६० कारवाई करण्यात आली. याच महिन्यात सर्वांत कमी ३५ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली. डिसेंबरमध्ये सर्वाधिक एक लाख ९४ हजार २०० रुपयांची वसुली झाल्याचे समोर आले आहे.

वर्षभर वाहन तपासणी धडक मोहीम राबविल्याने याचा परिणाम म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री एकही अपघात झाला नाही. चालकांनी बेकायदा वाहन चालवू नयेत. विना परवाना, ट्रिपल सीट प्रवास, मद्यप्राशन करून गाडी चालवणे, विनाहेल्मेट प्रवास केल्यास कारवाई करण्यात येईल. नवीन वर्षातही कारवाई सुरू राहणार आहेत.
- नितीन हरवटे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा विक्रमगड

तालुक्यातील वर्षभरातील कारवाई
महिना केस दाखल दंड
जानेवारी १४९ ७४,७००
फेब्रुवारी २६१ १,२६,४००
मार्च २७१ १,४७,२००
एप्रिल १६७ ८३,५००
मे ६० ३५,५००
जून २२२ १,७६,२००
जुलै २०१ १,२४,९००
ऑगस्ट १८८ १,७४,०००
सप्टेंबर २०५ १,५१,१००
ऑक्टोबर २२६ १,८३,९००
नोव्हेंबर १३७ ९२,३००
डिसेंबर २४५ १,९४,२००
एकूण २,३३२ १५,६३,९००

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.