Test Cricket : बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर टीम 2 टेस्ट खेळणार, पाहा वेळापत्रक
GH News January 07, 2025 06:13 PM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने मायदेशात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह पॅट कमिन्सच्या नेतृत्वात तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने ही मालिका गमावली. तसेच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा पोहचण्यात अपयशी ठरली. तर ऑस्ट्रेलियाने या विजयासह सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलमध्ये धडक दिली. आता या तिसऱ्या साखळीतील अंतिम फेरीत जून महिन्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महाअंतिम सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलिया या महाअंतिम सामन्याआधी या साखळीतील अखेरची कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत.

दोन्ही संघांची ही नववर्षातील पहिली कसोटी मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धची गत कसोटी मालिका जिंकली आहे. तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. आता त्यानंतर श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 29 जानेवारी-रविवार 2 फेब्रुवारी, गाले

दुसरा सामना, गुरुवार 6 फेब्रुवारी- सोमवार 10 फेब्रुवारी, गाले

एकमेव एकदिवसीय सामना, गुरुवार 13 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी झेप

दरम्यान ऑस्ट्रेलियाला या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका विजयानंतर मोठा फायदा झाला आहे. तर टीम इंडियाला आणखी एक झटका लागला आहे. आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत, टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावली. त्यामुळे हा फटका बसला आहे. तर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पछाडत या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.