दिल्ली : दिल्लीत आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यातच ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ‘आप’मध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावत ‘आप’ची बाजू घेतली आहे.
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. पण, हे कुणालाही मान्य नाही, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
– Advertisement –
हेही वाचा : गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांकडून मालमत्ता विक्रीचा प्रयत्न होताच ईडीनं…
संजय राऊत म्हणाले, “दिल्लीच्या आखाड्यात सगळे उतरले आहेत. आखाड्यात एकमेकांचे कपडे फाडणे, वस्त्रहरण करणे, चिखलफेक करणे, एकमेकांना लोळवणे आणि संपवण्याची भाषा करणे सुरू आहे. आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आला आहे, तो भाजप आहे. लोकसभेला आम्ही सगळ्यांनी भाजपला मागे रेटले. इंडिया आघाडीनं एनडीएचा पराभव केला. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवर सरकार आहे.”
– Advertisement –
“दुर्दैवानं दिल्लीत ते चित्र दिसत नाही. प्रत्येकाला दिल्लीची सत्ता हवी आहे. दिल्लीची सत्ता कुणाच्याच हाती नाही. लोकशाही मार्गानं केजरीवालांची सत्ता आली, तरी दिल्लीची सत्ता नायब राज्यपाल, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या हातात आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“भाजपचा पराभव करण्यासाठी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. मला आश्चर्य वाटतेय काँग्रेस आणि आप लोकसभेला एकत्र लढले. आमच्या व्यासपीठावर केजरीवाल आले, केजरीवालांच्या व्यासपीठावर काँग्रेसवाले गेले होते. पण, दिल्लीत काँग्रेसनं केजरीवालांना देशद्रोही ठरविण्याचा आणि तसा प्रचार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला शिवसेनेनं समर्थन नाही,” अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
“आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहिला पाहिजे. टीका-टिप्पणी होऊ शकते. राजकीय विरोध होऊ शकतो. पण, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणे कुणालाही मान्य होणार नाही,” असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसला फटकारलं आहे.
हेही वाचा : संजय राऊतांनी अजितदादांचा घेतला समाचार; म्हणाले, “ते नेते नाहीत, असते तर…”