(Santosh Deshmukh Murder) मुंबई : सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तथापि, धनंजय मुंडे यांनी स्वत:हून पायउतार होत, नैतिकतेच्या प्रथेचे पालन करावे, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे. मात्र, तसे होत नसल्याने त्यांचा ‘गॉडफादर’ कोण आहे, अशी चर्चाही रंगली आहे. (Will Munde resign on moral grounds?)
ब्रिटनमध्ये 31 जानेवारी 2018 रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांना सभागृहात पोहोचायला एक मिनिट उशीर झाला. आपल्या खात्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी वेळेत उपस्थित राहू न शकल्याने बेट्स यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करत राजीनाम्याची घोषणा केली होती. अर्थात, पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. आपल्या मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींकडून तशी अपेक्षा करू शकत नाही, पण किमान नैतिक जबाबदारी स्वीकारून पूर्वसुरींप्रमाणे राजीनामा देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवायला हवी होती, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Dhananjay Munde : मी राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितले; मंत्रिमंडळ बैठकीला हजर
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्र्यापर्यंत नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिल्याचा इतिहास आहे. बॅ. ए. आर अंतुले (कथित सिमेंट घोटाळा), शिवाजीराव पाटील निलंगेकर (गुणवाढ प्रकरण), मनोहर जोशी (जावयाचे भूखंड प्रकरण), विलासराव देशमुख (रामगोपाल वर्माप्रकरण) आणि अशोक चव्हाण (आदर्श घोटाळा) या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या आरोपांमुळे पदाचे राजीनामा दिले होते.
– Advertisement –
एवढेच नव्हे तर, माजी उपमुख्यमंत्री बॅ. रामराव आदिक (कथित एअर होस्टेस छेडप्रकरण), गृहमंत्री आर. आर. पाटील तथा आबा (26/11 हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य) यांच्यासह बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन तसेच अलीकडे विद्यमान मंत्री संजय राठोड (पूजा चव्हाण आत्महत्या) यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीदेखील सप्टेंबर 2012मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सिंचन घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात त्यांनी हा निर्णय घेतला हहोता. जोपर्यंत मी सर्व आरोपातून मुक्त होत नाही तोपर्यंत मी कोणतेही मंत्रिपद किंवा पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण आता तेच अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना दिसत आहेत, हे उल्लेखनीय!
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी आणि एसआयटी याबरोबरच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यामुळे वाल्मीक कराडशी असलेले संबंध लक्षात घेता, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधकांसह सत्ताधारीही एकवटले आहेत. भाजपाचे आमदार सुरश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबरच मुंडे यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती.
मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना थेट अभय दिले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात राजकारण करण्याची गरज नाही. चौकशी सुरू असून त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर, देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने सध्या तरी मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. मात्र, धनंजय मुंडे हेसुद्धा राजीनामा न देण्याच्याच मन:स्थितीत आहेत. आपण राजीनामा दिलेला नाही, असे सांगत ते काल, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. (Santosh Deshmukh Murder: Will Munde resign on moral grounds?)