मालदीवचे संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर : राजनाथ सिंह यांची भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत भेटीवर आलेले मालदीवचे संरक्षणमंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्याशी भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागिदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन साकार करण्याच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
भारत दौऱ्यादरम्यान मालदीवचे संरक्षणमंत्री मोहम्मद घसान मौमून यांना माणेकशॉ सेंटरमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मालीच्या विकास प्रकल्पांना आणि संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्यासाठी भारताच्या बिनशर्त पाठिंब्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. विशेषत: दोन्ही देशांमधील संबंध बिघडत असताना द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी मौमून बुधवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, कार्यशाळा आणि सेमिनार यासह संरक्षण सहकार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारत मालदीवला क्षमता निर्माण करण्याचे पर्याय पुरविणार आहे. तसेच संरक्षण उपकरणे आणि स्टोअर्सचा पुरवठा करत आहे. या भागीदारीमध्ये भविष्यातही तीच गती कायम ठेवण्यावर चर्चेत भर देण्यात आला.
एक विश्वासू भागीदार आणि जवळचा मित्र या नात्याने भारत मालदीवच्या विकासाच्या गरजा आणि तेथील लोकांच्या कल्याणासाठी पाठिंबा देत राहील, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे भारत दौऱ्यावर असताना मौमून यांच्याशी झालेल्या त्यांच्या शेवटच्या भेटीची आठवण सिंह यांनी त्यांच्या मालदीवच्या समकक्षांशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेच्यावेळी केली.
मालदीव मंत्र्यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळाली असून, या भेटीदरम्यान जारी करण्यात आलेला संयुक्त व्हिजन डॉक्युमेंट दोन्ही देशांसाठी मार्गदर्शक तत्त्व आहे, असे भारतीय संरक्षणमंत्री म्हणाले. दोन्ही देशातील संबंध नेहमीच जवळचे, सौहार्दपूर्ण आणि बहुआयामी राहिले आहेत. हिंद महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धी आणण्याच्या उद्देशाने भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणांतर्गत मालदीवने विशेष स्थान व्यापले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
मौमून यांनी मानले भारताचे आभार
मालदीवचे संरक्षणमंत्री मौमून यांनी संकटकाळात भारत हा मालदीवचा ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ असल्याचा उल्लेख करत भारताच्या ऐतिहासिक भूमिकेचे कौतुक केले. मालदीवमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि संरक्षण आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी भारताने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मालदीव सरकारच्या विनंतीवरून भारताने मालदीवला संरक्षण उपकरणे आणि साहित्य दिले. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल, असा अशावादही त्यांनी व्यक्त केला.